राहुल गांधी क्षणभर आले, आभाळभर ऊर्जा देऊन गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:35 PM2018-06-13T14:35:05+5:302018-06-13T14:35:05+5:30
अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी हे धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज सकाळी नागपुरात विमानाने आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी हे धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज सकाळी नागपुरात विमानाने आले. विमानतळावरूनच ते थेट नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी हेलिकॉप्टरने रवाना होणार होते. पण बाहेर त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते ताटकळत उभे असल्याचे कळताच त्यांनी लगेच दखल घेतली. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर लगबगीने आले. नमस्कार घेत, हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले व निघून गेले. त्यांच्या क्षणभर येण्याने कार्यकर्त्यांना मात्र आभाळभर आनंद व ऊर्जा मिळाली.
राहुल गांधी यांचे सकाळी ११ वाजता विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील होते. विमातळावर माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अनंतराव घारड, डॉ. बबनराव तायवाडे, नाना गावंडे, सुरेश भोयर, सुनिता गावंडे, अभिजित वंजारी, उमाकांत अग्नीहोत्री, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, माजी आमदार सेवक वाघाये, एस.क्यु. जमा, शेख हुसैन, संजय महाकाळकर, तक्षशिला वाघधरे, प्रज्ञा बडवाईक, कुंदा राऊत, मुजिब पठाण, गिरीश पांडव, प्रमोदसिंग ठाकूर, राजेश कुंभलकर, रवी घाडगे पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.
या वेळी आपण राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आल्यामुळे बाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या स्वागतासाठी जमले असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना दिली व बाहेर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी येण्याची विनंती केली. राहुल गांधी यांनी लगेच विनंती मान्य केली व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी विमानतळाच्या प्रवेश द्वारावर आले. सुरक्षेच्या कारणावरून त्यांना विमानतळाबाहेर येता आले नाही. पण काचेच्या प्रवेशद्वाराआडून त्यांनी हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले. हात जोडत आभार व्यक्त केले. त्यांची एक झलक पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. कार्यकर्त्यांनी ढोलताशांचा निनाद करीत राहुल गांधी यांच्या सन्मानार्थ जोरदार घोषणाबाजी केली.