राहुल गांधींनी केली देशाची बदनामी - अश्विनीकुमार चौबे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 10:56 AM2023-03-20T10:56:24+5:302023-03-20T10:57:17+5:30
भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होणारच
नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात केलेले वक्तव्य ही देशाची बदनामी आणि मान खाली घालवणारे आहे. त्यांना देशद्रोह्यांच्या श्रेणीत ठेवले तरी कमी होणार नाही, असे मत केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी व्यक्त केले.
एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. चौबे म्हणाले, राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन इथल्या लोकशाहीवर बोलून भारताची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले आहे. याच युवराजांचे देशव्यापी अभियान 'टायटाय फिश' झाले. लोकांनी बहिष्कार टाकला. यामुळे त्यांना बाहेर जाऊन बोलावे लागले. अशा या युवराजाला भारतीय जनता कदापि सहन करणार नाही. त्यांना देशद्रोही म्हणून ओळखले जाईल.
काँग्रेसने देशाला लुटण्याचे काम केले आहे. नोटिसांचे येणे-जाणे आता सुरूच राहणार आहे. जे केले त्याचे फळ भोगावेच लागणार आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. आज ईडी, आयटी, पोलिसांच्या नावाने गळे काढून ओरड सुरू आहे. पण, ते आपले काम करीत आहे. या सर्व स्वायत्त संस्था आहेत. त्यांच्यावर सरकारचा कुठलाही दबाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागील ९ वर्षांपासून देशात भाजप सरकार आहे. आजवर एकाही मंत्र्यावर छोटा आरोप लावता आला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस ही लोकांची चळवळ होती. स्वातंत्र्यानंतर नकली काँग्रेसचे रूप धारण करून देशावर सत्ता काबीज केल्याची टीका त्यांनी केली.
१५ वर्षांवरील वाहनेही स्क्रॅप होतील
१५ वर्षे जुनी शासकीय वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून इथेनॉलचे प्रमाणही वाढविण्यात आले. १५ वर्षे जुन्या खासगी वाहनांची फिटनेस तपासणी केली जाईल. त्यांची स्थिती योग्य नसल्यास त्याच्यावरही कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.