राहुल गांधी अपरिवक्व नेते, दलित-आदिवासींची करत आहेत दिशाभूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 16:46 IST2024-11-16T16:44:59+5:302024-11-16T16:46:50+5:30
किरण रिजीजूंचा आरोप : कॉंग्रेस म्हणजे खोटे आश्वासन देणारी फॅक्टरीच

Rahul Gandhi is an immature leader, misleading Dalits and tribals
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :राहुल गांधी इतकी वर्षे राजकारणात आहेत. मात्र त्यांना अद्यापदेखील दलित किंवा आदिवासी समाजाबाबत फारशी माहिती नाही. निवडणूक आली की वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट ते करत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांनी नेहमीच आदिवासी व दलितांची दिशाभूल केली आहे. ते अद्यापही अपरिपक्व नेतेच आहेत, असा आरोप केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी लावला. नागपुरात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
आज कॉंग्रेस व महाविकासआघाडीचे नेते संविधान हाती घेऊन प्रचार करत आहेत व भाजपवर आरोप करत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पुढाकारामुळे २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करणे सुरू झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हरविण्यासाठी कॉंग्रेसनेच षडयंत्र केले होते. त्यांचा कॉंग्रेसने नेहमीच अपमान केला. मात्र मतांच्या राजकारणासाठी आता कॉंग्रेस संविधानप्रेमी असल्याचे नाटक करत आहेत. कॉंग्रेस नेत्यांनीच नेहमी आरक्षणाला विरोध केला आहे, असा दावा किरण रिजीजू यांनी केला. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हिजननुसार संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेवर एक ग्रंथ केंद्र सरकार काढणार आहे. त्यात कॉंग्रेसने केलेल्या विरोधांचे रेकॉर्डदेखील असतील व जनतेसमोर यातून सत्य आणण्यात येईल, असे रिजीजू यांनी सांगितले.
संसदेतील भाषणांचा दर्जा घसरला
एक काळ होता जेव्हा कॉंग्रेसमधूनदेखील संसदेत अतिशय सखोल व अभ्यासपूर्ण भाषणे व्हायची. मात्र राहुल गांधी संसदेत आल्यापासून भाषणांचा व चर्चांचा दर्जा घसरला आहे. त्यांचा स्वत:चा काहीच अभ्यास नसतो. कुणीतरी लिहून दिलेले भाषण ते वाचतात. कॉंग्रेसमधील जे अभ्यासू खासदार आहेत, त्यांना भितीपोटी हवे तसे भाषण करता येत नाही, असा दावा रिजीजू यांनी केला.
८० टक्के मुस्लिमांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. याबाबत विविध पातळ्यांवर मुस्लिम संघटना, महिला संघटनांशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ८० टक्के मुस्लिमांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शविला आहे. वक्फच्या नावाखाली कोट्यवधींच्या जमिनी लॅंड माफियांनीच गिळंकृत केल्या आहेत. त्याचा गरीबांना कुठलाही फायदा झालेला नाही. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर या जमिनींचा मुस्लिम समाजातील मुले, तरुण, महिला यांच्या विकासासाठीच उपयोग करण्यात येईल, असे रिजीजू यांनी सांगितले.