नागपूर :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी यांच्या भ्रष्टाचाराविरोधात संसदेत आवाज उठवताच कट रचून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. मात्र, त्यानंतरही राहुल गांधींनी माफी मागून माघार घेतली नाही. ते माफीवीर नाहीत, तर लढणारे नेते आहेत. संविधान वाचविण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे ‘डरो मत’चा नारा देत राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री नितीन राऊत यांनी केले.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री उत्तर नागपुरातील कमाल चौकात ‘डरो मत’ जाहीर सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी होते. माजी मंत्री नितीन राऊत, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे जम्मू आनंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे वेदप्रकाश आर्य, शब्बीर विद्रोही, भीम पँथरचे तारिक शेख, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी गीतेंद्रसिंह दर्शन, उद्धव ठाकरे गटाचे प्रमोद मानमोडे, रिपाइं (से.)चे दिनेश अंडरसहारे, बंडोपंत टेंभूर्णे, मनोज बनसोडे, महेंद्र भांगे आदी उपस्थित होते. या सभेत उपस्थित सर्वच नेत्यांनी केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत असल्याची टीका करीत लोकशाही धोक्यात आल्याचे सांगितले.
यावेळी राऊत म्हणाले की, देशाची संसद, न्यायपालिका व प्रशासन ज्या पद्धतीने काम करीत आहे, ते पाहता भविष्यात संविधान बदलण्याचा धोका दिसतो. राहुल गांधी यांनी नफरत छोडो म्हणत ४ हजार किलोमीटर पायी चालत ‘भारत जोडो’चा संदेश दिला. त्यांचा तुम्ही सूडबुद्धीने बदला घेत आहात. पण, आम्ही घाबरणार नाही. जमिनीवर लढाई लढून तुमचा सामना करू, असा इशारा राऊत यांनी दिला.
सतीश चतुर्वेदी म्हणाले की, काँग्रेसने ५५ वर्षे सरकार चालविले; पण कधी विरोधकांना वेठीस धरले नाही. पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे पंतप्रधान असताना विरोधकांची टीका सहन करायचे. पण, कुणालाही संसदेबाहेर काढले नाही. आता तर ज्या राज्यात निवडणुका असतात, तेथे विरोधकांच्या घरी आधी ईडी, सीबीआय व आयटी पोहोचते. उघड दडपशाही सुरू आहे. कुणाल राऊत यांनी कोरोना काळात पीएम केअर फंडाच्या नावाखाली जमा केलेला पैसा २० हजार कोटींच्या रूपात अदानीला दिला का, असा सवाल केला.