नागपूरः राहुलसारख्या लोकांनी कितीही अपमान केला तरी सावरकरांची महानता कमी होत नाही. मात्र राहुल गांधी यांच्यामुळे सावरकरांचे चारित्र्य घरांघरात व नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी त्यांचे आभारच मानायला हवे. त्यांनी असेच काम करायला हवे. ‘मरता क्या नही करता’ व ‘अंधेरी रात में दिया तेरे हात में’ अशी राहुल गांधी यांची अवस्था झाली असल्याचा चिमटा गडकरी यांनी काढला. नागपुरात सावरकर गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. भाजप अजिबात जातीयवादी नाही व आम्हाला भेदाभेददेखील मान्य नाही. कॉंंग्रेसचे लोक धर्मनिरपेक्षतेच्या मोठमोठ्या बाता करतात, मग जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राहुल गांधी यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मण बोलवून मंत्राग्नी का दिला, असा प्रश्न गडकरी यांनी उपस्थित केला.
शंकरनगर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित समारोप कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, खा.सुधांशु त्रिवेदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी खासदार अजय संचेती, खा.कृपाल तुमाने, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, राजे मुधोजी भोसले इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
महात्मा गांधींना सावरकरांची देशभक्ती कळली, आजच्या गांधींना कधी कळणार ?यावेळी सुधांशु त्रिवेदी यांनीदेखील राहुल गांधी यांच्यावर इतिहासातील दाखले देत टीका केली. महात्मा गांधी यांनी हरिजन या त्यांच्या वृत्तपत्रात सच्चा, प्रखर व साहसी देशभक्त अशा शब्दांत सावरकरांचे कौतुक केले होते. सावरकरांना इंग्रजांचे मनसुबे माझ्याअगोदर व जास्त प्रमाणात कळाले असेदेखील ते म्हणाले होते. महात्मा गांधींना सावरकरांची देशभक्ती कळली होती, मात्र आजच्या गांधींना कधी कळणार, असा सवाल त्रिवेदी यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसच्या एकाही नेत्याला काळ्यापाण्याची शिक्षा, फाशी झाली नाही किंवा लाला लाजपतराय वगळता एकही नेता गोळीबार किंवा लाठीमारात शहीद झाला नाही. कॉंग्रेसचे नेते दिवसा आंदोलन करायचे व रात्री इंग्रजांसोबत जेवायचे. मात्र स्वातंत्र्याचे श्रेय मात्र तेच घेऊन गेले. मुळात ब्रिटीशकालीन भारतीय सैन्यात असंतोष पसरला होता व ही बाब आपल्याला महागात पडेल याच विचारातून इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिले, असा दावा त्रिवेदी यांनी केला.