गुजरात राहुलमय, मोदींचा ग्राफ उतरल्याचा अतुल लोंढे यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:54 PM2017-12-05T23:54:17+5:302017-12-05T23:57:23+5:30
गुजरातमध्ये दीड महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ग्राफ सर्वच वर्गात झपाट्याने वाढला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत तेवढीच घट झाली. गुजरात काँग्रेसमय झाले असून सत्तांतर अटळ आहे, असा दावा लोंढे यांनी लोकमतशी बोलताना केला.
लोकमत नागपुरात
नागपूर : गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची फौज पाठविण्यात आली. राज्यातील नेत्यांनी गुजरातमध्ये जाऊन काँग्रेसच्या काळात महाराष्ट्राचा कसा विकास झाला याचा आलेख मांडला. प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे तब्बल दीड महिना गुजरातमध्ये प्रचारासाठी होते. या दीड महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ग्राफ सर्वच वर्गात झपाट्याने वाढला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत तेवढीच घट झाली. गुजरात काँग्रेसमय झाले असून सत्तांतर अटळ आहे, असा दावा लोंढे यांनी लोकमतशी बोलताना केला.
अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर दक्षिण गुजरातचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लोंढे यांना सूरतचे प्रभारी नेमण्यात आले. त्यांनी १२ सप्टेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत दक्षिण गुजरातमधील २० विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. प्रचार दौरावरून नागपुरात परतल्यावर लोंढे यांनी गुजरातमध्ये त्यांनी केलेले काम व तेथे अनुभवलेली स्थिती लोकमतकडे मांडली. लोंढे म्हणाले, व्यापारी, सामाजिक संघटनांना एकत्र करून त्यांच्यासमोर काँग्रेसची जीएसटी व आर्थिक विषयांबाबत असलेली भूमिका मांडण्याचे काम केले. व्यापारी वर्गात काँग्रेसविषयी असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी पार पाडली. व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची राहुल गांधी व मनमोहन सिंग यांच्यासोबत संवाद घडवून आणला. यातून व्यापारी आणखी काँग्रेसच्या जवळ येण्यास मदत झाली. लिंबायत, वागरा, बारडोली, मजुरा, वाराच्छा या भागात पाटीदार संघटना, शिक्षक संघटनांशी भेटी घेतल्या. जाहीर सभा घऊन काँग्रेसची भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.
आपण प्रत्यक्षात मोठमोठ्या व्यापारी संघटनांशी चर्चा केली. त्यावेळी टेक्सटाईल, डायमंड व्यापारी मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे दिसून आले. कर देण्यास व्यापाऱ्यांचा विरोध नाही. मात्र, जीएसटीच्या क्लिष्ट पद्धतीमुळे त्रस्त झाले आहेत. मजुरीवरही कर लावण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. जीएसटी व नोटबंदीचा मोठा प्रभाव तेथील जनजीवनावर झाला आहे. गुजरातची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. १ लाख पॉवरलूम बंद झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष उद्योगांना भेटी देणे सुरू केले. त्यावेळी तेथील लोकांना काँग्रेस आपल्यासाठी काही करू शकते, असा विश्वास निर्माण झाला. २०१२ मध्ये मोदींना पंतप्रधान बनवायचे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तेथील जनतेने भाजपाला मतदान केले.
२०१४ मध्ये २६ पैकी २६ खासदार भाजपाचे निवडून दिले. मात्र, आपला अपेक्षाभंग झाला. भाजपाने धोका दिला, अशी येथील लोकांची भावना झाली आहे. २०१५-१६ मध्ये ३१ जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी २४ काँग्रेसने जिंकल्या होत्या. महापालिका व नगरपालिकांमध्येही मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले आहेत. कोणताच घटक भाजपासोबत नाही. तर राहुल गांधी यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणात तरुण नेतृत्व निर्माण झाले आहे. याचा सकारात्मक परिणाम होऊन गुजरातमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा दावा त्यांनी केला.
शेतकरी व युवक भाजपावर नाराज
भूसंपादनाच्या नावावर शेतकरी नाडल्या गेला आहेत. उद्योग सुरू झाल्यावर आरोग्य, शिक्षण आदी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. शेतमालाला भाव नाही. ३० लाख युवक बेरोजगार आहे. पंतप्रधान सातत्याने दिशाभूल करीत आहे, अशी येथील युवकांची धारणा केली जाते. त्यांना राहुल गांधी साधे आणि प्रामाणिक वाटतात. भरूचमधील जंबुसर येथे मोदींच्या सभेत ४० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. तर दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी घेतलेल्या सभेत पाय ठेवायलाही जागा नव्हती. युवकांची प्रचंड गर्दी होती. महिला वर्ग पूर्णपणे काँग्रेसकडे वळला असल्याचे लोंढे यांनी सांगितले.
सामाजिक आंदोलनांचा प्रभाव
गुजरातच्या निवडणुकीत सामाजिक आंदोलनाचा मोठा प्रभाव आहे. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर व प्रवीण राम या चारही युवक नेत्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. पाटीदारसह ओबीसी समाजही भाजपावर नाराज आहे. यामुळे सामाजिक समीकरणेही भाजपाच्या विरोधात गेली आहेत.