नागपूर : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यावरून केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षांकडून हिंदू धर्माचा जाणूनबुजून अपमान करण्यात येत आहे. इंडिया आघाडीतील एक सदस्य सनातन धर्माचा अपमान करत आहेत. अशा स्थितीत विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर आपले मौन तोडले पाहिजे. विशेषत: राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांनी या अपमानावर बोलले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. सोमवारी नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विरोधकांकडून सनातन धर्माचा अपमान होतो आहे. विरोधी पक्षांत एकानंतर दुसरा नेता अशा प्रकारची वक्तव्य करत आहे. त्यांचा चेहरा अगोदरच भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे व ते केवळ सनातन धर्माचा अपमान करण्यावर भर देत आहेत. त्यातून त्यांची मानसिकता लक्षात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सनातन धर्माच्या अपमानावर मौन बाळगले आहे. सत्तेच्या लालसेपोटी काही लोक आपली विचारसरणी विसरले आहेत. सनातनच्या अपमानावरही ते काहीच बोलत नाहीत, असे प्रतिपादन करताना त्यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्यावर होता.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी गीता आणि उपनिषदे वाचल्याच्या दाव्यावर अनुराग ठाकूर म्हणाले की, आधी त्यांनी सनातन धर्माच्या अपमानावर बोलावे. सनातन धर्माच्या अपमानावर मौन बाळगल्याने विरोधकांची विचारसरणी स्पष्ट होत आहे, असा आरोप त्यांनी लावला.