प्राप्तिकर खात्याची कारवाई : डीपी जैन;ओम शिवम बिल्डकॉनचा समावेश नागपूर : प्राप्तीकर खात्याच्या पथकांनी शहरातील दोन मोठ्या व्यावसायिक समूहांसह १४ ठिकाणी धाडी घालून महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले. ज्या ठिकाणी धाडी पडल्या त्यात डीपी जैन आणि ओम शिवम बिल्डकॉन समूहाचाही समावेश आहे. प्राप्तीकर खात्याच्या नागपूर अण्वेषण संचालनालयामार्फत ही कारवाई करण्यात आली. ७० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या वेगवेगळ्या पथकांनी मंगळवारी एकाच वेळी उपरोक्त दोन समूहांच्या संचालकांच्या निवास तसेच त्यांच्या सनदी लेखापालांच्या (सीए) कार्यालयात धडक दिली. डीपी जैन समूहाच्या लॉ कॉलेज चौकातील मुख्य कार्यालयासह, समूहाचे संचालक संजय जैन यांचे कार्यालय, ओम शिवम बिल्डकॉनचे संचालक चंद्रशेखर कापसे यांच्या पांडे लेआऊटमधील निवासस्थानी या पथकांनी चौकशी केल्याची माहिती आहे. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, डीपी जैन समूहाच्या कामकाजात प्राप्तीकरासंबंधी गडबड होत असल्याच्या संशयामुळे धाडीची कारवाई करण्यात आली. तर, ओम शिवम बिल्डकॉनच्या संबंधाने दुसरीच चर्चा आहे. या चर्चेनुसार, समूहातर्फे शंकरपूरमध्ये ५०० सदनिकांचा गृहप्रकल्प तयार आहे. त्याला प्रतिसाद मिळत नसूनही या गृहप्रकल्पाला बंद करण्यात आले नाही. रियल इस्टेट क्षेत्रात मंदीचे वातावरण असताना शंकरपूर प्रकल्पासाठी समूहाकडे पैसा कुठून आला, त्याचा शोध घेण्यासाठी प्राप्तीकर खात्याने आज छापेमारी केल्याची चर्चा दिवसभर संबंधित वर्तुळात सुरू होती. या छापेमारीत प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण कागदपत्रे हाती लागल्याचीही चर्चा आहे. (प्रतिनिधी)
दोन समूहांसह १४ ठिकाणी धाडी
By admin | Published: July 27, 2016 2:46 AM