लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध कोळसा खदानीतून ठिकठिकाणी पाठविण्यात येणारे कोळशाचे ट्रक मध्येच थांबवून त्यातून कोळशाची चोरी तसेच तस्करी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला. या टोळीतील सहा आरोपींना भंडारा रोडवरील कापसी येथे सोमवारी सकाळी रंगेहात पकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून कोळसा तसेच चार ट्रक असा एकूण ६२ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. एक आरोपी मात्र फरार झाला आहे. पहिल्यांदाच झालेल्या या धाडसी कारवाईमुळे कोलमाफियांचे धाबे दणाणले आहे.अजहर शेख इनायत शेख (रा. टेकाडी इंदर कॉलनी, खदान कन्हान), नसीम शेख रहातुल्ला शेख (वय ३९, रा. दहेगाव. खापरखेडा), मंगेश धरमराज ठवरे (वय ३०, रा. हनुमान टेकडी, कन्हान), रामबहोर द्वारकाप्रसाद चौधरी (वय ३०, रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश), रामचंद्र अंकुश मानकर (वय ४१, रा. सरस्वतीनगर दिघोरी) आणि उदय शंकर सिंग (वय ४८, रा. निवृत्तीनगर, कळमना) असे अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहत, तर फरार तस्कराचे नाव रामनारायण ठाकूर असून तो काटोल मार्गावर राहतो.गेल्या अनेक वर्षांपासून कोलमाफियांकडून कोळसा चोरी आणि विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे. अनेकांना मोठा हप्ता मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. ही माहिती गुन्हे शाखा युनिट पाचला मिळाली. भंडारा मार्गावरील कापसीच्या पाल पेटोल पंपामागील जय भोले धर्मकाट्याजवळ कोलमाफियांचा अड्डा होता. त्यावर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सोमवारी सकाळी छापा घातला. यावेळी तेथे उपरोक्त आरोपी चोरीच्या कोळशाची विल्हेवाट लावताना दिसले. बाजूलाच साठा करून ठेवलेला कोळसा चार ट्रकमधून काळाबाजारात विक्रीकजरता जाणार होता. पोलिसांनी साठवून ठेवलेला कोळसा तसेच कोळशाने भरलेले ट्रक जप्त केले. अनवर साहेब खान (रा. आंबेडकरनगर) यांच्या मालकीचा एक ट्रक तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचे दिसून आल्यामुळे खान यांची तक्रार घेऊन कळमना ठाण्यात उपरोक्त तस्करांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.