खापा : पाेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध माेहीम उघडली आहे. या पथकाने शनिवारी सायंकाळी खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हत्तीखेडा शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात पाेलिसांनी दारूभट्टी उद्ध्वस्त केली व दाेघांविरुद्ध गुन्हे दाखल करून २ लाख ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना हत्तीखेडा येथील जंगलालगतच्या भागात माेहफुलाची दारूभट्टी असल्याची माहिती प्राप्त झाली हाेती. त्यामुळे या पथकाने पाहणी केली व दारूभट्टी आढळून येताच धाड टाकली. यात लीलाधर महादेव शाेधले (३९, रा. काेथुळणा, ता. सावनेर) व हुकूमचंद नागाे शुक्रेवार (३९, रा. निमतलाई, ता. सावनेर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
या कारवाईमध्ये संपूर्ण दारूभट्टी नष्ट करून २ लाख ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात १७० लिटर माेहफुलाची दारू, ३०० लिटर दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे माेहफुलाचे रसायन व इतर साहित्याचा समावेश आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, सहायक फाैजदार बाबा केचे, चंद्रशेखर घडेकर, राजेश रेवतकर, आशिष मुळे, किशाेर वानखेडे, नम्रता बघेल, अमाेल कुथे, गंगाधर ठाकरे, संताेष परतेती यांच्या पथकाने केली.