लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फूड गॅरेज, द जेलर किचन आणि दिल्ली दरबार या तीन हॉटेल-ढाब्यांवर उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने सोमवारी पोलिसांच्या मदतीने छापेमारी केली. तेथे विना परवाना दारू उपलब्ध करून दिल्याचे दिसून आल्याने संबंधित हॉटेलच्या संचालकांसह ग्राहकांवरही कारवाई केली.वर्धा मार्गावर उपरोक्त तीनही हॉटेल-कम ढाबे आहेत. हॉटेलच्या मालक-संचालकांकडे परवाना नसताना तेथे ग्राहकांना चढ्या दरात पाहिजे ती दारू उपलब्ध करून दिली जाते. ही माहिती कळल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने, उपायुक्त मोहन वर्दे यांनी पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांच्याशी चर्चा करून पोलीसदल मागवून घेतले. त्यानंतर एक्साईज खात्याचे निरीक्षक रावसाहेब कोरे तसेच सहायक निरीक्षक सखाराम मोले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सोमवारी रात्री फूड गॅरेज, जेलर किचन आणि दिल्ली दरबार या हॉटेलमध्ये छापेमारी केली.परवाना नसताना तेथे हॉटेलच्या संचालकांकडून दारू उपलब्ध करून दिली जात असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी तेथून १२,५०० रुपयांची दारू जप्त केली. या प्रकरणी हॉटेलचे संचालक मुकेश गोविंदराव खवास, आशिष खडतकर आणि गुलशन घनश्याम दातरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी तेथे विनापरवाना मद्यप्राशन करताना आढळलेले ग्राहक पराग पौनीकर, पारसराव रासकठ्ठा, अक्षय मेश्राम, समीर डोंगरे, कैलास राहुलगडे, आकाश जैन, अजिंक्य गजभिये, मनि आर. अविनाश कृष्ण चैतन्य, शुभम कोमरेवार, पटेल बदरेश, अक्षय इमले, सागर चव्हाण, दिनेश मिस्त्री आणि संकेत कुकडे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना सूचनापत्र देऊन १३ नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्याची सूचना देण्यात आली.उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या नेतृत्वात निरीक्षक अशोक शितोळे, सुनील सहस्त्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक राजेश मोहोड, सागर धिंडसे, रविराज सोनुने, मुकुंद चिटमटवार, दिलीप बडबाईक, पूजा रेखे, उपनिरीक्षक नरहरी फड, प्रशांत येरपुडे तसेच कर्मचारी राहुल पवार, नीलेश पांडे, रमेश कांबळे आणि संजय राठोड यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरातील फूड गॅरेज, द जेलर किचन आणि दिल्ली दरबारमध्ये छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:49 PM
फूड गॅरेज, द जेलर किचन आणि दिल्ली दरबार या तीन हॉटेल-ढाब्यांवर उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने सोमवारी पोलिसांच्या मदतीने छापेमारी केली.
ठळक मुद्देविना परवाना दारूचा पुरवठा : संचालकांवर गुन्हे, १५ मद्यपींनाही पकडले : एक्साईज आणि पोलिसांची संयुक्त कारवाई