लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : पाेलिसांनी भानेगाव (ता.सावनेर) येथे सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून सहा जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल केला, शिवाय त्यांच्याकडून राेख रक्कम व इतर साहित्य असा एकूण १ लाख ५६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी दिली.
भानेगाव शिवारातील निर्जन ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती खापरखेडा (ता.सावनेर) पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. तिथे जुगार खेळला जात असल्याचे लक्षात येताच, पाेलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या सहा जणांना ताब्यात त्यांची झडती घेतली. यात पाेलिसांनी त्यांच्याकडून १,८०० रुपये राेख, सात माेटारसायकली व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ५६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
जुगार खेळणाऱ्यांची नावे कळू शकली नाही. मात्र, यातील पाच जण भानेगाव तर एक जण बिना जाेड येथील रहिवासी असल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. पाेलिसांनी फिल्मी स्टाईलने या जुगारावर धाड टाकल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस हवालदार उमेश ठाकरे, अश्विन गजभिये, कैलास पवार, दीपक रेवतकर, प्रमोद भोयर, आशिष भुरे, नुमान शेख, राजू भोयर यांच्या पथकाने केली.