लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तांडापेठ परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पाचपावली पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा घालून १७ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि १४ मोबाइलसह एक लाख एक हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तांडापेठेतील प्रकाश सोशल क्रीडा मंडळ इमारतीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पाचपावली पोलिसांना शनिवारी मिळाली. त्यावरून पोलिसांनी सायंकाळी ४.३० च्या सुमारास तेथे छापा घातला. या वेळी एका खोलीत प्रकाश सावनेरकर, चैतराम गुमगावकर, शिवशंकर रणदिवे, रवी उमरेडकर, ज्ञानेश्वर बोकडे, गोविंदा नंदनवार, दीपक बेंडे, राजू उमरेडकर, कुलदीप सहारे, लीलाधर सोनकुसरे, अनिल गोखले, शकिल कुरेशी, रामचंद्र वाघ, रसुल पठाण, देवा पुणेकर, राहुल गोखले आणि नरेंद्र देवीकर हे ताशपत्त्यावर जुगार खेळताना सापडले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख २० हजार रुपये, १४ मोबाइल तसेच अन्य साहित्य असा एकूण एक लाख एक हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पाचपावलीचे ठाणेदार संजय मेंढे यांच्या नेतृत्वात डीबी प्रमुख प्रमोद खंडार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.