लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोली (रामटेकेनगर)तील हातभट्टीच्या अड्ड्यावर परिमंडळ ४च्या पोलिस उपायुक्तांच्या पथकाने गुरुवारी छापा घातला. यावेळी अड्ड्यावरचा हजारो लिटर दारूचा सडवा नष्ट करण्यात आला. तर गाळून ठेवलेली ५० लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपी दिनेश पन्नालाल मानकर त्यांच्याविरुद्ध अजनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.लॉकडाऊनमुळे नागपुरातील देशी- विदेशी दारूची दुकाने बंद असल्याने हातभट्टीच्या दारूला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे विविध भागात हातभट्टीची दारू विकणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. बेसा-बेलतरोडी मार्गावरील टोली, रामटेकेनगरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळून विकली जाते. बेसा, बेलतरोडी, पिपळा, मनीषनगर या भागात जागोजागी मोठमोठी बांधकामे आणि विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे या भागात मजुरांच्या मोठ्या प्रमाणात वसाहती (झोपड्या) आहेत. हजारोंच्या संख्येत राहणाऱ्या या मजुरांपैकी बहुतांश मजुरांना रोज हातभट्टीची दारू हवी असते. ती मिळावी म्हणून घोळक्या घोळक्यातील मजूर हे टोली, रामटेकेनगर तसेच आजूबाजूंच्या भागातील दारूविके्र त्यांकडे धाव घेतात. या सबंधाने लोकमतने ६ मेच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या वृत्ताची दखल घेऊन परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांनी त्यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक राऊत यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून माहिती काढून घेतली. पक्की माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास रामटेके नगरातील दिनेश मानकरच्या अड्ड्यावर छापा घालण्यात आला. टोलीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन उपायुक्तांच्या पथकाने अजनी पोलिसांचे डीबी पथक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकही कारवाईसाठी सोबत घेतले होते.मानकरच्या अड्ड्यावर ड्रम, डबक्या आणि मटक्यात हातभट्टीचा सुमारे दोन हजार लिटर सडवा होता. तो नष्ट करण्यात आला. तर, ५० लिटर दारू जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालली. अजनी ठाण्यात मानकरविरुद्ध दारूबंदी कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
नागपुरातील रामटेकेनगरात हातभट्टीवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 9:25 PM