लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमाल चौकातील फिरंगी कॅफे अॅन्ड लाऊंजमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. येथे पोलिसांनी हुक्क्याचा धूर उडविणाऱ्या १० अल्पवयीन मुलामुलींसह २५ जणांना ताब्यात घेतले.कुख्यात गुंड सुमित परमानंद मोरयानी (वय २७), सौरभ गोपाल घोगे (वय २२, रा. राणी दुर्गावती चौक) आणि हिमांशु रंजित गायकवाड (वय २२, रा. शेंडेनगर, टेका नाका) हे तिघे कमाल चौकातील इमारतीच्या चौथ्या माळ्यावर फिरंगी कॅफे अॅन्ड लाऊंज चालवीत होते. येथे जेवणासह हुक्का पार्लरचीही व्यवस्था असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून फिरंगीत युवक आणि युवतींची वर्दळ राहायची. ही माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. बुधवारी त्यांनी दोन पंटर पाठवून शहानिशा केली. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास अचानक छापा घातला. या छाप्यात हुक्क्याच्या नशेत झिंगत असलेले १० अल्पवयीन विद्यार्थी आणि २० अन्य जण आढळले. तेथून पोलिसांनी हुक्क्याचे १० पॉट, वेगवेगळे सुगंधी तंबाखूचे बॉक्स आणि अन्य साहित्य जप्त केले. त्यानंतर मोरयानी, घोगे तसेच गायकवाडविरुद्ध पाचपावली ठाण्यात कलम ४(अ), २१ (अ) कोप्टा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, सहायक निरीक्षक मेश्राम, उपनिरीक्षक मयूर चौरसिया, संजय मिश्रा, एएसआय महेंद्र थोटे, हवालदार राजेश यादव, मंगेश लांडे, प्रशांत लांडे, अजय बघेल, नायक अरुण चांदणे, दिनेश चाफलेकर, रवी शाहू, नरेंद्र ठाकूर, उत्कर्ष राऊत, सचिन आंधळे आणि फराज खान यांनी ही कामगिरी बजावली.बंदी असूनही नागपुरात हुक्का सुरूचविशेष म्हणजे, राज्यात हुक्काबंदीसंबंधीचा कायदा कठोर झाल्यानंतर उपराजधानीतील अनेक ठिकाणचे हुक्का पार्लर बंद पडले. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही हुक्का पार्लर सुरू आहेत. त्यात विद्यार्थी आणि मोठ्या संख्येत तरुणी धूर उडवताना दिसतात. या छाप्यात उच्चभ्रू परिवारातील पाच तरुणी हुक्क्याच्या धुरात संगीताच्या तालावर थिरकत असताना दिसल्या. पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांना मुक्त केले.