लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमाल चौकातील फिरंगी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. येथे पोलिसांनी नशेत झिंगणाऱ्या १० अल्पवयीन मुलामुलींसह ३० जणांना ताब्यात घेतले.कुख्यात गुंड सुमित मोरयानी याच्या मालकीचे कमाल चौकात फिरंगी हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट आहे. या हॉटेलमध्ये जेवणासह हुक्का पार्लरचीही व्यवस्था आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून फिरंगी हॉटेलमध्ये युवक आणि युवतींची वर्दळ राहायची. ही माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. बुधवारी त्यांनी दोन पंटर पाठवून शहानिशा केली. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास अचानक छापा घातला. या छाप्यात हुक्क्याच्या नशेत झिंगत असलेले १० अल्पवयीन विद्यार्थी आणि २० अन्य जण आढळले. तेथून पोलिसांनी हुक्क्याचे पॉट, वेगवेगळे सुगधी तंबाखूचे बॉक्स आणि अन्य साहित्य जप्त केले.विशेष म्हणजे, राज्यात हुक्का बंदीसंबंधीचा कायदा कठोर झाल्यानंतर उपराजधानीतील अनेक ठिकाणचे हुक्का पार्लर बंद पडले. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही हुक्का पार्लर सुरू आहेत. त्यात विद्यार्थी आणि मोठ्या संख्येत तरुणी धूर उडवताना दिसतात. या छाप्यात उच्चभ्रू परिवारातील पाच तरुणी हुक्क्याच्या धुरात संगीताच्या तालावर थिरकत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीसाठी सर्वांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. उशिरा रात्रीपर्यंत या संबंधाने कारवाई सुरू असल्याने सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, या कारवाईला पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी दुजोरा दिला आहे.