लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तहसील पोलिसांनी शहरातील कुख्यात दारूमाफिया चरण गौर याच्या अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईदरम्यान चरणच्या एका साथीदारास अटक करण्यात आली. तर दुसरा साथीदार फरार झाला. सतीश गंगाराम गौर (४०) रा. भानखेडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर चरण कल्लन गौर (४०) आणि महेंद्र हेमराज गौर (४०) रा. भानखेडा फरार आहेत.चरणविरुद्ध १०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तो भानखेडा येथील भोईपुरा दुर्गामंदिराजवळ दारूचा अड्डा चालवतो. हा अड्डा रेल्वे रुळाजवळ आहे. तिथे तहसील व पाचपावली पोलीस ठाण्याची सीमा आहे. याचा फायदा घेऊन चरण आपली जागा बदलवीत असतो. पोलिसांनी बुधवारी सकाळी चरणच्या अड्ड्यावर धाड टाकली. तिथे १४ ट्यूब आणि १० डबक्यांमध्ये एक हजार लिटर मोहाची दारू सापडली. पोलिसांनी सतीश गौरला अटक करून दारू जप्त केली. या दारूची किंमत जवळपास एक लाख रुपये आहे.चरण गौर काटोल रोडवरील भिवसेनखोरी आणि ग्रामीण भागातून दारू आणतो. भिवसेनखोरी येथे मोठ्या प्रमाणावर दारूच्या भट्ट्या आहेत. या भट्ट्यांना पोलिसांचा आश्रय आहे. अनेकदा चरणच्या अड्ड्यावर जात असलेली दारूही पकडण्यात आली. परंतु त्याच्याविरुद्ध कुठलीही कारवाई झाली नाही. चरणला एकदा एमपीडीए अंतर्गत तुरुंगातही पाठवण्यात आले आहे. तो नेहमी पोलिसांना चकमा देऊन फरार होतो.ही कारवाई डीसीपी राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक जयेश भांडारकर, दिलीप सागर, एपीआय आर.आर. पाटील, हवालदार अमरलाल ठाकुर, मुख्तार शेख, नायक शिपाई सुनील ठाकुर, सुजय मिश्रा, गणेश गिरी, प्रवीण वाजगे, शिपाई राष्ट्रपाल दहिवाले, अजित ठाकुर, विकास यादव आणि मोहन ठाकुर यांनी केली.
नागपुरातील कुख्यात चरण गौरच्या अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 9:54 PM
तहसील पोलिसांनी शहरातील कुख्यात दारूमाफिया चरण गौर याच्या अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईदरम्यान चरणच्या एका साथीदारास अटक करण्यात आली.
ठळक मुद्देएक लाखाची दारू जप्त : तहसील पोलिसांची कारवाई