पोलिसांची सरप्राईज व्हिजिट : तपासणीमुळे खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी रात्री सदर आणि अंबाझरीतील रेस्टॉरंट, लाऊंज तसेच हुक्का पार्लरमध्ये अचानक छापेमारी करून परिमंडळ - २ च्या पोलीस फक्त उपायुक्त विनीता शाहू यांनी तेथे तपासणी केली. यामुळे संबंधित रेस्टॉरंटमध्ये खळबळ उडाली होती.
सदर आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक ठिकाणी अद्यापही हुक्का पार्लर सुरू आहेत. ड्राय डेच्या दिवशी अनेक ठिकाणी दारू विकली जाते, असा यापूर्वीचा अनुभव आहे. आज ड्राय डे असल्यामुळे पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांनी आपल्या पथकासह सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्ही-५, चिल अँड ग्रील तसेच अन्य काही ठिकाणी तर अंबाझरीतील बॅरलमध्ये रात्री ९.३० ते ११ च्या दरम्यान छापेमारी केली. पोलिसांना या ठिकाणी तपासणीत काहीच मिळाले नाही. मात्र, अचानक पोलिसांचा ताफा धडकल्याने संबंधित हॉटेल आणि संचालकांची धावपळ उडाली होती.
---
बातमी लिक झाली?
सदरमध्ये अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि लाऊंजमध्ये ड्राय डेच्या दिवशी चढ्या भावाने दारू विकली जाते. अनेक ठिकाणी हुक्काही उपलब्ध करून दिला जातो. पोलीस उपायुक्तांच्या छाप्यात एकाही ठिकाणी काहीच न मिळाल्यामुळे पोलीस ठाण्यातून छापेमारीची पूर्वसूचना संबंधिताना दिली की काय, अशी शंका चर्चेला आली आहे
---