१२ लाखाचा मुद्देमाल जप्त : हेटी सुरला शिवारातील कारवाई
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : पाेलिसांच्या पथकाने हेटी सुरला शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात दारू काढणाऱ्या आराेपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण १२ लाख ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. २८) दुपारी करण्यात आली.
अशोक नुसाते असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हेटी सुरला शिवारात माेहफुलाची दारूभट्टी असल्याची महिती प्राप्त हाेताच सावनेर पाेलिसांच्या पथकाने त्या शिवाराची लगेच पाहणी केली. यात त्यांना नाल्याच्या काठी दारूभट्टी आढळून येताच पाेलिसांनी धाड टाकली. यात पाेलिसांनी दारू काढणाऱ्या अशाेक नुसाते यास ताब्यात घेत अटक केली.
त्याच्याकडून ५ लाख ७६ हजार रुपयाचा माेहफुलाचा सडवा (रसायन), ते ठेवण्यासाठी वापरलेले प्लास्टिक ड्रम, चार लाख ५० हजार रुपये किमतीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्राॅली, पाच हजार रुपयाचे १० प्लास्टिक ड्रम, १४ हजार रुपयाचे लाेखंडी ड्म, आठ हजार रुपयाच्या दाेन प्लास्टिक टाक्या, पाच हजार रुपयेे किमतीचे लाकूड असे एकूण १२ लाख ९ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले, अशी माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.