लाेकमत न्यूज नेटवर्क
पाटणसावंगी : सावनेर पाेलिसांच्या पथकाने पाटणसावंगी (ता. सावनेर) शिवारातील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात आराेपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.
पाटणसावंगी शिवारात माेहफुलाची दारू काढली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची पाहणी केली असता, त्यांना या शिवारातील नाल्याच्या काठी असलेल्या झुडपांमध्ये माेहफुलाची दारूभट्टी आढळून येताच धाड टाकली. यात पाेलिसांनी आराेपी रामाजी सुगरथ कुंभरे (५६, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर) यास ताब्यात घेत अटक केली. शिवाय, त्याच्याकडून १८० लिटर माेहफुलाचा सडवा, दाेन लाेखंडी ड्रम, दारू तयार करण्यासाठी व साठवण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संपूर्ण दारूसाठा व साहित्य घटनास्थळीच नष्ट केले, अशी माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, संदीप नागरे, हेमराज कोल्हे, कृष्णा जुनघरे यांच्या पथकाने केले.
....
सट्टापट्टी स्वीकारणारा अटकेत
याच पथकाने पाटणसावंगी येथील बाजार चाैकात कारवाई करीत सट्टापट्टी स्वीकारणाऱ्या मनोहर कृष्णाजी कामडी (३५) यास संशयाच्या बळावर ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे सट्टापट्टीचे साहित्य आढळून आले. त्यामुळे पाेलिसांनी त्याला अटक करीत त्याच्याकडील सट्टापट्टीचे साहित्य जप्त केले. शिवाय, त्याच्या विराेधात गुन्हाही नाेंदविला. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.