लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दाढेरा शिवारात सुरू असलेल्या माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून दारूभट्टी नष्ट केली. या कारवाईत माेहफुलाची दारू, सडवा व इतर साहित्य असा एकूण २ लाख २७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.२०) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
दाढेरा शिवारातील एका शेतात अवैधरीत्या माेहफुलाची दारूभट्टी सुरू असल्याची गुप्त सूचना केळवद पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी त्या परिसरात पाहणी केली. दारूभट्टी सुरू असल्याचे दिसून येताच पाेलिसांनी तेथे धाड टाकून संपूर्ण दारूभट्टी उद्ध्वस्त केली. पाेलिसांना पाहून आराेपी अमित चंद्रपाल राजपूत (रा. तिडंगी) व महिलेने तेथून पळ काढला. या कारवाईत २,४०० लिटर माेहफुलाची दारू, १८० लिटर माेहफुलाचा सडवा तसेच दारू काढण्याचे इतर साहित्य असा एकूण २ लाख २७ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार दिलीप ठाकूर, पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठाेड, अरुण गुंठे, देवा देवकते, गुणवंता डाखाेळे, सचिन येलकर, रवींद्र डाेरले, अश्विनी निकाेसे यांच्या पथकाने केली.