लोकमत न्यूज नेटवर्क
बुटीबोरी : पाेलिसांनी ढवळपेठ येथील माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकत दारू गाळणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण २ लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आराेपींमध्ये दाेन महिलांचा समावेश आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ८) सकाळी १० ते ११.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये रणजीत फुलचंद भोसले, विकास उर्फ आकाश तुलाराम वाघमारे, कैलास छापेकर यांच्यासह अन्य दाेन महिलांचा समावेश आहे. सर्व आराेपी ढवळपेठ, ता.नागपूर (ग्रामीण) येथील रहिवासी आहेत. आसाेला-सावंगी परिसरातील ढवळपेठ येथे माेहफुलाची दारूभट्टी असून, तिथे दारू गाळली जात असल्याची माहिती बुटीबाेरी पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने त्या शिवाराची प्रत्यक्ष पाहणी केली.
तिथे दारूभट्टी आढळून येताच, पाेलिसांनी लगेच धाड टाकली. यात दाेन महिलांसह एकूण पाच जणांना ताब्यात घेत पाेलिसांनी अटक केली, शिवाय त्यांच्याकडून दाेन लाख रुपये किमतीचा चार हजार लीटर माेहफुलाचा सडवा (रसायन), ६० हजार रुपयांची १२५ लीटर माेहफुलाची दारू, २५ हजार रुपयांचे ३० ड्रम व एक हजार रुपयांचे जलाऊ लाकडे असा एकूण २ लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.
ही संपूर्ण दारूभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली. या प्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक आशिष मोरखडे, परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक कुमुदिनी पाथोडे, हवादार मिलिंद नांदुरकर, संजय बांते असलम शेख, सुरेश दिवे, सुनील भगत, सत्येंद्र रंगारी, विनायक सातव, रमेश काकड, मनीष करनाके, प्रवीण देव्हारे यांच्या पथकाने केली.