लाेकमत न्यूज नेटवर्क
पाटणसावंगी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी नजीकच्या इटनगाेटी शिवारात सुरू असलेल्या माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकली. यात तिघांविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यांना ताब्यात घेतले. शिवाय, त्यांच्याकडून १ लाख ८७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १) दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
रवी रामचंद्र सहारे (५२), संदीप मधूर धुर्वे (३५) व जितेंद्र तुकाराम राऊत (४०) तिघेही रा. पाटणसावंगी, ता. सावनेर अशी ताब्यात घेतलेल्या आराेपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर परिसरात गस्तीवर असताना त्यांना इटनगाेटी शिवारात माेहफुलाची दारूभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची पाहणी केली आणि दारूभट्टी आढळून येताच धाड टाकली. यात त्यांनी रवी सहारे, संदीप धुर्वे व जितेंद्र राऊत या तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून १,२०० लिटर माेहफुलाचा सडवा, ३०० लिटर माेहफुलाची दारू, दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ८७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पंचनामा केल्यानंतर संपूर्ण दारूभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला असून, तिन्ही आराेपी सावनेर पाेलिसांच्या ताब्यात आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फाैजदार बाबा केचे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.