लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (सीआयए) नामक खासगी संस्थेने उपराजधानीत कार्यालय उघडून गुप्तचर यंत्रणेच्या थाटात विविध प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. या संस्थेच्या कथित प्रमुखाने त्याच्या कारवर मोठ्या तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्याच्या कारवर असावे तसे एरियल लावले आहे. एवढेच नव्हे तर ‘स्टेट डायरेक्टर महाराष्ट्र क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजंसी’ असे लिहिलेली प्लेट कम फलकही लावला आहे. हा प्रकार शुक्रवारी उघड झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.अजनी (चुना भट्टी) जवळच्या पूर्व समर्थनगरात एफसीआय गोदाम असून, या गोदामाजवळच्या एका इमारतीत १४ फेब्रुवारीला यवतमाळ येथील नरेश पालारपवार नामक व्यक्तीने सीआयएचे कार्यालय थाटले. १६ फेब्रुवारीपासून तेथे विविध प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रारी घेतल्या जात असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कळाले. त्यावरून गुन्हे शाखा आणि धंतोली पोलिसांचे पथक शुक्रवारी दुपारी या कार्यालयात धडकले. कार्यालयाच्या आतमधील साजसज्जा गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयासारखी असल्याचे आणि बाह्यदर्शनी भागात एक वायरलेस सेट (बंद पडलेला) ठेवून असल्याचे पाहून पोलीसही चक्रावले. कार्यालयातील एक युवती कागदपत्रे हाताळत होती तर, बाहेर पालारपवार याची एमएच २९ / एडी ४६९६ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार उभी होती. कारवर लाल-निळ्या रंगाचा सीआयएचा झेंडा तसेच इंग्रजीत लिहिलेली ‘स्टेट डायरेक्टर महाराष्ट्र क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी’ भली मोठी नेमप्लेटही लावून होती. पोलिसांनी कार्यालय प्रमुख नरेश पालारपवारला विचारणा केली असता त्याने आपण सामाजिक दायित्वाच्या भावनेने विविध प्रकरणाची चौकशी करणार होतो, असे सांगितले. पोलिसांनी तेथील कागदपत्रे जप्त करून पालारपवारला धंतोली ठाण्यात नेले. तेथे त्याची उशिरा रात्रीपर्यंत चौकशी करण्यात आली.उत्तर प्रदेश कनेक्शन !सीआयएचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील गौंडा जिल्ह्यात असून तेथील प्रमुखाकडूनच आपण नागपुरात कार्यालय सुरू करण्याची परवानगी घेतल्याचे पालारपवारने पोलिसांना सांगितले. त्याचा संपर्क क्रमांकही दिला. त्यावरून पोलिसांनी प्रताप सिंग नामक व्यक्तीशी संपर्क करून त्याला मूळ कागदपत्रांसह नागपुरात येण्यास सांगितले. सिंग मंगळवारी नागपुरात येणार असून, पालारपवारला शनिवारी दुपारी ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात मंगळवारी कारवाईची भूमिका ठरवू असे धंतोलीचे ठाणेदार प्रसाद सणस यांनी लोकमतला सांगितले.
नागपुरात क्राईम ईन्वेस्टीगेशन एजंसीच्या कार्यालयावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 1:02 AM
क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (सीआयए) नामक खासगी संस्थेने उपराजधानीत कार्यालय उघडून गुप्तचर यंत्रणेच्या थाटात विविध प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. या संस्थेच्या कथित प्रमुखाने त्याच्या कारवर मोठ्या तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्याच्या कारवर असावे तसे एरियल लावले आहे. एवढेच नव्हे तर ‘स्टेट डायरेक्टर महाराष्ट्र क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजंसी’ असे लिहिलेली प्लेट कम फलकही लावला आहे. हा प्रकार शुक्रवारी उघड झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.
ठळक मुद्देतामझाम पाहून पोलीसही चक्रावले : यवतमाळच्या तरुणाची चौकशी