कामठी (नागपूर) : अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि कामठी (जुने) पाेलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खैरी (ता. कामठी) शिवारातील फ्रेंड्स ट्रान्सपोर्टच्या गाेदामात धाड टाकली. यात बनावट डिझेलसह २२ लाख ८२ हजार ९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही.
खैरी शिवारात असलेल्या फ्रेंड्स ट्रान्सपोर्टच्या गाेदामात बनावट डिझेल तयार करून ते बाजारात विकले जात असल्याची माहिती कामठी (जुने) पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी याबाबत अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिली आणि नंतर संयुक्तरीत्या धाड टाकली.
यात २८ हजार २०० रुपयांचे तीन हजार लिटर बनावट डिझेल, माेटरपंप, माेजमाप साहित्य असा एकूण २२ लाख ८२ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गाेदाम सील करण्यात आले, अशी माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकारी पंकज पंचभाई व ठाणेदार ठाणेदार दीपक भिताडे यांनी संयुक्तरीत्या दिली. याप्रकरणी कामठी (जुने) पाेलिसांनी भादंवि २८५, अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
आराेपीस अहवालानंतर कारवाई
या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही किंवा ताब्यात घेण्यात आले नाही. गुन्हा कुणाविरुद्ध दाखल करण्यात आला, ते गाेदाम कुणाच्या मालकीचे आहे, यात किती जणांचा सहभाग आहे, हेदेखील पाेलिसांनी स्पष्ट केले नाही. या डिझेलचे नमुने नागपूर शहरातील शासकीय प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणेदार दीपक भिताडे यांनी दिली.