नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकातर्फे वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देहव्यापार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी तेथून एका अल्पवयीन मुलीसह दोघींची सुटका करण्यात आली. तर दोन महिलांसह तीन जणांना अटक करण्यात आली.
वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगरातील सद्गुरू लॉनजवळ एका घरात विद्या धनराज फुलझेले (४२) नावाची महिला देहव्यापाराचा अड्डा चालविते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीची खातरजमा केली. पोलिसांनी पंटरला ग्राहक बनवून विद्याकडे सौदा करण्यासाठी पाठवले. आरोपींनी ३ हजार रुपयांत अल्पवयीनचा सौदा करून ग्राहकाला भाड्याने घेतलेल्या खोलीवर बोलावले. ग्राहकाचा इशारा मिळताच पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली. तेथे सीमा सुधाकर सहारे (३१, राऊतनगर) व सुधाकर श्रीराम नरुले (५१, आनंदनगर, जरीपटका) हेदेखील आढळले.
पोलिसांनी तेथून १४ वर्षे व १९ वर्षे वयाच्या दोन मुलींची सुटका केली. आरोपी मुलींच्या आर्थिक स्थितीचा फायदा उचलत त्यांना देहव्यापारात ढकलायचे. तिन्ही आरोपींविरोधात पिटा व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत वाठोडा पोलिस ठाण्यातील पथकाच्या ताब्यात देण्यात आले. विद्या अनेक दिवसांपासून देह व्यवसायात सक्रिय आहे. यापूर्वीही पोलिसांनी तिला अटक केली होती. पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात डीसीपी मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ, समाधान बळबजकर, दीपक बिंदाने, मनीष पराये, सुनील वाकडे, आरती चव्हाण, अश्विनी खोडपेवार, शरीफ शेख, ऋषिकेश डुमरे आणि सुधीर तिवारी यांच्या चमूने ही कारवाई केली.