लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या एसएसबीने धरमपेठ येथे बिनधास्तपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लर रूफ-९ वर कारवाई केली आहे. २० दिवसात रूफ-९ वर गुन्हे शाखेची ही दुसरी करावाई आहे.
हे हुक्का पार्लर लाहोरी हॉटेलचे संचालक समीर शर्मा यांचे आहे. लक्की जयस्वाल त्याचा भागीदार आहे. लक्कीचे परिसरात रेस्टॉरेंट आहे. पोलिसांचा हुक्का पार्लरला विरोध असतानाही समीर पार्लर चालवित होता. याची माहिती एसएसबीला मिळाली. एसएसबीच्या पथकाने सोमवारी सायंकाळी रूफ-९ वर छापामार कारवाई केली. पोलिसांना समीर व लक्की कर्मचाऱ्यांच्या मदतीने हुक्का पार्लर चालविताना दिसले. यावेळी दोन महिलांसह चार पुरुष हुक्का सेवन करीत होते. त्यांना प्रतिबंधित असलेल्या तंबाखूचा हुक्का दिला होता. कारवाई होत असल्याचे बघून समीर शर्मा व लक्की जायसवाल तेथून पसार झाले. ४ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी पकडले. त्यांना ताब्यात घेऊन १.३३ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले. कोरोनामुळे हुक्का पार्लर बंद आहे. परंतु समीर व लक्की हुक्का पार्लर बिनधास्त चालवीत होते.
समीरचे हिंगणा येथे एलपीके रेस्टॉरेंट आहे. एक महिन्यापूर्वी तिथेही कारवाई करण्यात आली होती. तर गुन्हे शाखेने ७ ऑक्टोबर रोजी रूफ-९ वर छापा टाकून समीरला पकडले होते. त्या कारवाईचा कुठलाही परिणाम झाला नाही. समीरच्या विरुद्ध कोराडी येथील जमिनीवर कब्जा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे सीताबर्डी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांना लाहोरी व रूफ-९ च्या बाबतीत सर्वच माहिती आहे. दोन्ही सीताबर्डी पोलीस ठाण्या अंतर्गत येतात. ७ ऑक्टोबरला झालेल्या कारवाईनंतर सीताबर्डी पोलिसांनी रूफ-९ वर लक्ष ठेवले नाही. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय अनिल अंबाडे, शिपाई चेतन गेडाम, भूषण हाडे, मनीष रामटेके, अजय पौनीकर, सुधीर तिवारी, रीना जाऊरकर, सुजाता पाटील तसेच कुमुदिनी मेश्राम यांनी केली.