लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धनिक महिलांकडून चालविण्यात येणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर जरीपटका पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात चार महिला जुगार खेळताना पोलिसांच्या हाती लागल्या. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेऊन जुगाराचे साहित्य तसेच ३,६६० रुपये जप्त केले. मंगळवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.पोलीस अधूनमधून कारवाई करीत असले तरी, शहरातील विविध भागात राजरोसपणे जुगाराचे अड्डे भरविले जातात. झोपडपट्ट्यांमध्ये कमी आणि पॉश सदनिकांमध्ये तसेच शहरातील काही हॉटेलमध्येही लाखोंची हार-जीत करणारे जुगार अड्डे भरविले जातात. धनिक मंडळी या जुगार अड्ड्यावर काही तासात लाखोंची हार-जीत करतात. परंतु जरीपटक्यातील दयानंद पार्क , पार्लर झोनमध्ये एका गल्लीत एक महिला धनिक महिलांसाठी जुगार अड्डा चालविते, अशी माहिती पोलिसांना कळली. त्यानुसार पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, सहायक आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे आणि निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल देवकर, एएसआय महादेव भांगे, हवालदार गजेंद्र ठाकूर, सुनील तिवारी, राजेश साखरे, नायक आसिफ शेख, गणेश बरडे, पद्माकर उके, वैशाली चरपे आणि रजनी रायपुरे यांनी मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास महिलांच्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी तेथे रेणू साधवानी (वय ४५, रा. सेतिया चौक), मीना रेहानी (वय ५०, रा. कुशीनगर), सीमा गिदवानी (वय ४३, रा. कुशीनगर) आणि ज्योतिप्रकाश हरजानी (वय ५०, रा. हुडको कॉलनी) या चार जणी ताशपत्त्यांवर जुगार खेळताना आढळल्या.दोन जणी पसार!पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५२ ताशपत्ते तसेच ३,६६० रुपये जप्त केले. पोलीस दारावर असल्याची कुणकुण लागताच दोन जुगारी महिला मागच्या मागून पळून गेल्या. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांवर जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. शहरात पहिल्यांदाच महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.