लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (काेंढाळी) : स्थानिक गुन्हे शाखा आणि काेंढाळी पाेलिसांच्या संयुक्त पथकाने काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मसाळा (ता. काटाेल) शिवारात असलेल्या फार्म हाऊसमधील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकली. यात क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारणाऱ्या चाैघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण १३ लाख ३८ हजार ५९८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. २४) रात्री करण्यात आली.
दिनेश ताराचंद बन्साेड (५२, रा. धम्मकीर्तीनगर, वाडी, नागपूर) व अमाेल शंकरराव नाडीनवार (४०, रा. वाठाेडा, नागपूर), प्रवीण बंडू वाकडे (३३, रा. देशमुख ले-आऊट, काेंढाळी, ता. काटाेल) व अतुल गंगाधर दाेडके (४५, रा. म्हाडा काॅलनी, नरेंद्रनगर, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. आयपीएल(इंडियन प्रीमियर लीग)मध्ये शनिवारी काेलकाता नाईट रायडर आणि दिल्ली कॅपिटल संघादरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर मसाळा शिवारातील गुलमाेहर नामक फार्म हाऊसमध्ये सट्टा स्वीकारला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली हाेती. या पथकाने काेंढाळी पाेलिसांची मदत घेत लगेच त्या फार्म हाऊसची पाहणी केली. तिथे क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारला जात असल्याचे स्पष्ट हाेताच धाड टाकली.
या धाडीत पाेलिसांनी चाैघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपयाची कार, ५६ हजार रुपयाचे आठ माेबाईल हॅण्डसेट, २० हजार रुपयाचा टीव्ही, कॅल्क्युलेटर, सेट टाॅप बाॅक्स, आकडे नमूद असलेले कागद व इतर साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत १३ लाख ३८ हजार ५९८ रुपये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. हे फार्म हाऊस ताराचंद बन्साेड, रा. वाडी, नागपूर यांच्या मालकीचे असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक ढगे करीत आहेत.