लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलिसांनी गेल्या सात तासात ८६ ठिकाणी छापेमारी करून १३ लाखांची (१३० ग्रॅम) एमडी, ७.८ लाखांची (१३३ ग्रॅम) चरस आणि अडीच किलो गांजा जप्त केला. या कारवाईमुळे शहरातील ड्रग तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज दुपारी शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील ड्रग तस्कर तसेच ड्रग पेडलर्स यांच्याकडे एकाचवेळी नियोजनबद्धरीत्या कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कारवाईसाठी एकूण ८६ पथके तयार करण्यात आली. या पथकाने शहरातील अमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या ८६ गुन्हेगारांशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. दुपारी ४ वाजतापासून सुरू झालेली ही कारवाई रात्री ११.१५ वाजेपर्यंत सुरूच होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी
१३० ग्रॅम एमडी, १३० ग्रॅम चरस आणि अडीच किलो गांजा असे एकूण १९ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले.
या कारवाई दरम्यान २० आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान काही ठिकाणी जुगार अड्डे पोलिसांना सापडले. तर काही गुन्हेगारांकडे शस्त्रही सापडले. रात्री ११.१५ नंतरही कारवाई सुरूच होती.
या संबंधाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपलब्ध माहितीला दुजोरा दिला. अनेक ठिकाणी ड्रग तस्करांकडे शस्त्रही सापडले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.
''ड्रग फ्री सिटी'' बनवायची आहे
नागपूर शहराला ''ड्रग फ्री सिटी'' बनवायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची ही छापामारी कारवाई असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.