नागपूर - गुन्हे शाखेच्या पथकाने यशोधरानगरातील एका सुपारी कारखान्याावर छापा मारला. सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून आरोग्यास अपायकारक असलेली ही सुपारी बाजारात विकायला पाठवली जात असल्याची तक्रार मिळाल्यामुळे शनिवारी दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली.
नागपूर हे सडक्या सुपारीच्या तस्करीचे मुख्य केंद्र आहे. इंडोेनेशिया, मॅनमारसह ठिकठिकाणच्या सुपारी तस्करांशी नागपुरातील सुपारी तस्करांचे संबंध आहेत. आरोग्यास अपायकारक असलेली सडलेली सुपारी त्या देशात घाणीच्या ढिगाऱ्यातून उचलून हे तस्कर आणतात. लकडगंज, शांतीनगर, यशोधरानगर, ईतवारी, कापसी कळमनासह विविध भागात असलेल्या भट्टीत या सडलेल्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून ती टणक आणि शुभ्र बनवून विकली जाते. या सडक्या सुपारीचा नंतर सुगंधित सुपारी, पानमसाला, गुटखा आणि खर्ऱ्यात वापर केला जातो. या सुपारीची नागपूरहून महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह विविध राज्यात तस्करी केली जाते.
एफडीएतील काही भ्रष्ट मंडळी तसेच काही ठिकाणच्या पोलिसांना लाखोंचा हप्ता मिळत असल्याने ते या तस्करीकडे लक्ष देत नाही. यशोधरानगरात अशा सडक्या सुपारीवर प्रक्रिया करून ती टणक बनवली जात असल्याची तक्रार गुन्हे शाखेच्या परिमंडळ तीनच्या युनिटला शनिवारी दुपारी मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने यशोधरानगरातील एका गृह उद्योगावर छापा घातला. मोहम्मद असलम शेख इमाम नामक व्यक्तीचा हा कारखाना असल्याचे पोलिसांना कळले. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसारच येथे सर्व चित्र होते. मोठ्या प्रमाणावर सुपारीची कटिंगही सुरू होती. ते पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए)च्या अधिकाऱ्यांना तेथे बोलवून घेतले. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या सुपारीचे नमूने ताब्यात घेऊन लाखोंचा साठा सिलबंद केला. एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईचा अहवाल आल्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरवण्यात येईल, असे कारवाई करणाऱ्या पोलिसांनी सांगितले आहे.
छोट्यांवर कारवाई, मोठ्यांना सुरक्षेची हमी
लोकमतने यापूर्वी शहरातील गुटखा तसेच सुपारी तस्करांच्या गोरखधंद्याची वेळोवेळी पोलखोल केली आहे. त्याची दखल घेत पोलिसांनीही अनेकदा छापेमारीसुद्धा केली आहे. मात्र, कारवाई छोट्या छोट्या तस्करांवरच होते. सुपारीच्या तस्करीतून लाखो नागरिकांच्या जिविताशी खेळणाऱ्या तसेच या गोरखधंद्यातील ‘बडे खेळाडू’ म्हणून कुख्यात असलेले कॅप्टन, माैर्या, बंटी, हारून, आनंद, पाटना, ईर्शाद, आसिफ कलीवाला, गनी, चारमिनार, मुनियार यांच्या अड्ड्यावर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे काही पोलीस आणि एफडीएचे काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी महिन्याला लाखोंची देण घेऊन त्यांना सुरक्षेची हमी देत असल्याचा आरोपाला बळ मिळत आहे.
---