नागपूर : तुम्ही तिकिट काढा तरी रेल्वेला उत्पन्न मिळते अन् ते काढलेले तिकिट कॅन्सल (रद्द) केले तरी रेल्वेला फायदाच होतो. होय, हे खरे आहे. प्रवासी वाहतूक, माल वाहतूकीसह वेगवेगळी सेवा देणाऱ्या भारतीय रेल्वेची स्थिती सध्या 'दोनो हाथो मे लड्डू' अशी आहे. नुसत्या रद्द झालेल्या तिकिटांमुळे रेल्वे प्रशासनाला तब्बल २४ कोटींचा फायदा झाला आहे.
भारतीयांची लोकवाहिनी म्हणून ओळख असलेल्या रेल्वेने अलिकडच्या काही वर्षांत आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार, विविध सेवा अन् उपक्रमही राबविे जात आहे. प्रवासी आणि मालवाहतुकीसोबतच रेल्वेगाडीच्या आतबाहेर खानपान सेवा, रेल्वेस्थानकांवर जाहिरात सेवा, वेगवगळे स्टॉल तसेच भाडेतत्वावर गाळे उपलब्ध करून देऊन रेल्वे प्रशासनाने चारही बाजूने आर्थिक गंगाजळी आपल्या तिजोरीकडे वळविण्याचे प्रयत्न चालविले आहे.
रेल्वेस्थानकावर लॉकर, एन्ट्री पासून तो पेट्रीपर्यंतच्याही सेवा रेल्वे देत आहेत. नुसत्या कबाडाच्या विक्रीतून कोट्यवधी रुपये मिळवत आहे. एकीकडे तिकिटाच्या आरक्षणातून आगावू रक्कम घेतानाच संबंधित प्रवाशांनी तिकिट रद्द केल्यानंतरही विशिष्ट रक्कम कपात करून रेल्वे प्रशासन आपली तिजोरी भरत आहे. अशाच प्रकारे नुसत्या रद्द झालेल्या तिकिटांच्या माध्यमातून रेल्वेने २४ कोटी, २६ लाख रुपये पदरात पाडून घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत नागपूर स्थानकावरून विविध रेल्वेगाड्यात १ कोटी, ८९ लाख, १४ हजार प्रवाशांनी प्रवास केला. शिवाय प्रवासाचा बेत ऐनवेळी रद्द झाल्याने संबंधित प्रवाशांनी १९ लाख, ९३ हजार तिकिट रद्द केल्या. या रद्द केलेल्या तिकिटातून रेल्वे प्रशासनाला २४ : २६ कोटींचा घसघशीत लाभ झाला आहे.
१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या वर्षभरात प्रवास करणारे नागरिक : १८९:१४ लाख रुपये
प्रवाशांपासून मिळालेले : उत्पन्न : ६०६ : ९५ कोटी रुपये
आरक्षित प्रवास करणारे : ६९:४९ लाख
मिळालेले उत्पन्न : ५२१:२४ कोटी रुपये
अनारक्षित तिकिटांवर प्रवास करणारे ११९: ६५ लाख
मिळालेले उत्पन्न : ८५: ७१ कोटी रुपये