- नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धडधडत्या ट्रेनमध्ये तिला प्रसवकळा सुरू झाल्या. तिच्यासोबत तिचे कोणतेच नातेवाईक नव्हते. ती वेदनांनी तळमळू लागली. ते पाहून एका सहप्रवाशाने 'रेल मदत'वर त्याची माहिती देऊन तात्काळ मदतीची मागणी नोंदवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही ट्रेन लगेच काटोल स्थानकावर थांबविण्याचे निर्देश दिले. तत्पूर्वी स्थानकावर रुग्णवाहिका आणि रेल्वे कर्मचारीही सज्ज ठेवले. त्यांनी महिलेला तात्काळ ट्रेनमधून खाली घेऊन हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. एखाद्या सिरियलची वाटावी अशी ही रियल स्टोरी आज नागपूर ते काटोल रेल्वे मार्गावर बेंगळुरू दानापूर एक्सप्रेसमध्ये घडली.
ट्रेन नंबर ०३२६० मध्ये कोमल नामक एक गर्भवती महिला आज सकाळी एकटीच प्रवास करीत होती. सकाळी ८.१४ वाजता गाडीने नागपूर स्थानक सोडले. साधारणत: २० मिनिटे झाली असतील कोमलला तीव्र प्रसवकळा सुरू झाल्या. ते लक्षात आल्याने बाजुच्या प्रवाशाने सकाळी ८.४५ वाजता 'रेल मदत'पोर्टलवर तक्रार नोंदवली. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच काटोल रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबविण्याचे निर्देश दिले. तिच्या प्रसुतीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले. त्यानुसार, जितेंद्र सिंग, सारिका सेलोकर आणि मिराबाई तसेच के. एन. देशमुख आदी कर्मचाऱ्यांनी कोमलला मदतीचा हात दिला. तिला ट्रेनमधून उतरवून काटोलच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे काही वेळेतच कोमलने एका गोंडस बाळाला जन्म दिला. नंतर या दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचा निर्वाळा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.नवजात शिशूचीही व्यवस्थारेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे कोमलला वेळेवर मदत मिळाली. त्यामुळेच तिची प्रसुती चांगल्या प्रकारे होऊ शकली. दरम्यान, रेल्वे कर्मचारी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी नवजात शिशूसाठी नवीन कपड्यांचीही व्यवस्था केली. हे सर्व झाल्यानंतर कोमलच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. त्यानंतर काही वेळेतच ते तेथे पोहचले.