दोन्ही परीक्षा एकाच दिवशी : विद्यार्थी एका परीक्षेला मुकणार
नागपूर : वाढत्या संसगार्मुळे १४ मार्च रोजी होणारी परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने आठ ते दहा दिवसांत परीक्षा घेण्याचे आश्वासन दिले आणि २१ मार्च ही तारीख जाहीर केली; परंतु २१ रोजी रेल्वेची एनटीपीसीची परीक्षा असल्यामुळे अनेक विद्यार्थांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.
कोरोनामुळे गेले वर्षभर संयम राखून असलेल्या एमपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्यामुळे सरकारला परीक्षा घेणे भाग पडले; पण एमपीएससीने जाहीर केलेल्या तारखेलाच रेल्वेची ३५२७७ पदांसाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. रेल्वेच्या परीक्षेचे परीक्षा केंद्र शहराबाहेर असल्यामुळे कोणतीही एकच परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. या ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अमरावती, औरंगाबाद येथे परीक्षा केंद्रे मिळाली आहेत. एमपीएससीची परीक्षा पूर्वनियोजित तारखेला झाली असती तर विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता आल्या असत्या.
१५ ते २१ मार्चपर्यंत नागपुरात टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे रेल्वेने नागपुरातील परीक्षार्थींसाठी नोटीस जारी केली आहे. यात रेल्वेने विद्यार्थ्यांना सांगितले आहे की परीक्षांकरिता जाताना आयकार्ड सोबत ठेवावे. रेल्वेची परीक्षा ही ३५,२७७ पदांकरिता असून, ही पाचव्या फेसमधील परीक्षा आहे. आता विद्यार्थ्यांना एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोना प्रकोप आणि मराठा आरक्षण यामुळे परीक्षांना स्थगिती देण्यात आली होती; परंतु आता परीक्षेची संधी मिळाली; पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना आता एकच परीक्षा देता येऊ शकणार आहे.
- विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात टाळेबंदी लागू असल्याने एमपीएससी आणि रेल्वेच्या परीक्षेकरिता लागणाऱ्या प्रवेश पत्राचे प्रिंट आऊट काढण्याकरिता विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. टाळेबंदीमुळे शहरातील इंटरनेट कॅफे, झेरॉक्स सेंटर सर्वच बंद झाले आहेत. त्यामुळे प्रवेश पत्राची प्रिंट आऊट कुठून काढावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
- काही विद्यार्थी राज्य शासनाची आणि रेल्वेची परीक्षा या दोन्हीच्या तयारीला लागले होते. एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने शेवटी विद्यार्थ्यांच्या हाती निराशाच आली.
सुबोध चहांदे, विद्यार्थी प्रतिनिधी
- जे विद्यार्थी आपल्या वयाच्या अंतिम टप्प्यात आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेची ही शेवटची संधी होती. ते विद्यार्थी यामध्ये एका परीक्षेला हुकलेले आहेत. कोरोना प्रकोप आणि इतर कारणांमुळे या वेळेस विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे कमी चान्स मिळाले होते. विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत केली; पण आता परीक्षा एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलीही एक निवडायची आहे.
अंजली मेश्राम, विद्यार्थिनी
- एमपीएससी आणि रेल्वेची परीक्षा असल्याने विद्यार्थी तयारीला लागले होते. परीक्षेची तयारी झालेल्या विद्यार्थ्यांना निराशा हाती लागली आहे. दोनपैकी कोणत्या परीक्षेची निवड करावी हा एक खूप मोठा संभ्रम आमच्यापुढे आहे.
-शशिकांत राऊत, विद्यार्थी