लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इतवारी रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत रेल्वेचे लोखंड चोरी करणाऱ्या आणि भंगार व्यावसायिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विभागीय सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनाखाली इतवारी आरपीएफचे निरीक्षक आर. के. सिंह, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास कुमार, उपनिरीक्षक बी. लेंबो, आरपीएफ जवान विवेक कनोजिया, ए. पासवान यांनी रेल्वेचे लोखंड चोरी करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध विशेष मोहीम राबविली. दरम्यान कळमना परिसरात लोखंड चोरी करणाऱ्या अनवर हैदर शेखला रंगेहात पकडले. त्याने अनिश खलील शेखला लोखंड विकल्याची माहिती दिली. त्या आधारे वनदेवीनगर झोपडपट्टीत अनिश जलील शेखच्या दुकानावर धाड टाकण्यात आली. तेथे अनवरकडून रेल्वेचे १० नगर चेअर प्लेट स्क्रु आणि अनिशकडून १७ नगर चेअर प्लेट स्क्रुसह २७ नगर चेअर प्लेट स्क्रु किंमत १५०० रुपये जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांना रेल्वे अवैध ताबा अधिनियमानुसार अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास बी. लेंबो करीत आहेत. दोन्ही आरोपींना शुक्रवारी रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
मोतिबाग आरपीएफने केली दोघांना अटक
मोतिबाग रेल्वे सुरक्षा दलानेही रेल्वेच्या मालकीचे लोखंड चोरी करणाऱ्या व ते विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकास अटक केली आहे. मोतीबाग रेल्वे सुरक्षा दलाने राबविलेल्या अभियानांतर्गत मोमिनपुरा, गार्ड लाईन चौक, कमाल चौक, मानकापूर चौक, कोराडी रोड आणि खापरखेडा येथील भंगार व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी खापरखेडा रोडवरील भंगाराचे दुकान मा जगदंबा स्कॅ्रप डेपोचा मालक रामबिहारी जगन्नाथ साहु (४५) याच्या दुकानाची तपासणी करण्यात आली. दुकानात रेल्वेचे २ नग अँगल कॉक, १ नग लोखंडाची चावी, १ नग सेंसींग डिव्हाईस अवैधरीत्या ठेवलेली आढळली. हे साहित्य फेरीवाला साहेब अंबादेकडून विकत घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर साहेबा बंडु अंबादे (३७) रा. मच्छिबाजार कोराडी याला अटक केली असता त्याने लोखंड विकल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तपास निरीक्षक गणेश गरकल करीत आहेत. ही कारवाई हेड कॉन्स्टेबल के. ए. अन्सारी, बंशी हलमारे, विजय विठोले, राजू पेशने यांनी केली.