नागपूर : स्वाईन फ्लूमुळे उपराजधानीत थैमान घातले असताना खबरदारी म्हणून तोंडावर मास्क लावून नागरिक घराबाहेर पडत आहेत. रेल्वेस्थानकावर सर्वाधिक गर्दी होत असल्यामुळे येथे स्वाईन फ्लूचा धोका सर्वात जास्त आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण असून रविवारी असंख्य प्रवासी तोंडाला मास्क, रुमाल बांधुन स्थानकात प्रवेश करताना दिसले.अचानक बदललेल्या हवामानामुळे स्वाईन फ्लूसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. उपराजधानीत स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या ५८ वर पोहोचली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिक विशेष खबरदारी घेत आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १२५ ते १३५ रेल्वेगाड्या आणि ४० ते ५० हजार प्रवासी ये-जा करतात. विविध राज्यातून येणाऱ्या या प्रवाशांमुळे स्वाईन फ्लू पसरण्याचा धोका अधिक आहे. याशिवाय प्लॅटफार्मवर गाडी आल्यानंतर एकच गर्दी होऊन प्रवाशांना दाटीवाटीतून मार्ग काढत बाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत एखाद्या प्रवाशाला स्वाईन फ्लू असल्यास त्याची लागण इतरांना होण्याची दाट शक्यता असते. रविवारी नागपूर रेल्वेस्थानकाच्या सर्वच प्लॅटफार्मवर प्रवासी तोंडाला मास्क आणि रुमाल लावून रेल्वेस्थानक परिसरात फिरताना दिसले. रेल्वेस्थानकावर ड्युटी करणारे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस, रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकणारे हॉटेल्सचे वेटर सर्वच जण स्वाईन फ्लूबाबत खबरदारी घेत होते. (प्रतिनिधी)
रेल्वे प्रवासी दहशतीत
By admin | Published: March 02, 2015 2:28 AM