नागपूर : दसरा, दिवाळी आणि छटपूजेसाठी भाविकांना पाहिजे त्या ठिकाणी जाता यावे. वाढलेल्या गर्दीमुळे त्यांना त्रास होऊ नये, हे ध्यानात घेत मध्य रेल्वेने १२ रेल्वेगाड्यांचा मुदत अवधी विस्तारला आहे. त्यामुळे लाखो भाविकांना दिलासा मिळणार आहे. सेवा विस्तार करण्यात आलेल्या गाड्यांचा अवधी खालीलप्रमाणे आहे.
ट्रेन नंबर ७६३७ तिरूपती साईनगर शिर्डी साप्ताहिक स्पेशल १५ ऑक्टोबरपासून २७ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. तर, परतीची ट्रेन नंबर ०७६३८ साईनगर शिर्डी - तिरूपती साप्ताहिक एक्सप्रेस १६ ऑक्टोबरपासून २७ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.
०७१९५ काझीपेठ- दादर साप्ताहिक ४ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत धावणार असून, याच मार्गावरची ०७१९६ दादर-काझीपेठ साप्ताहिक ५ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे.
विशेष म्हणजे, याच मार्गावर धावणारी दुसरी गाडी क्रमांक ०७१९७ काझीपेठ दादर स्पेशल गाडी ७ ऑक्टोबरपासून २५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. तर, ०७१९८ दादर- काझीपेठ स्पेशल ८ ऑक्टोबरपासून २६ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. ३० सप्टेंबरपासून या सर्व रेल्वे गाड्यांसाठी संकेतस्थळावर बुकिंग करता येणार आहे.
नागपूर स्थानकांवर होते प्रचंड गर्दी
विविध प्रांतातील खास करून छत्तीसगड, मध्यप्रदेश, बिहार, ओडिशा आणि यूपीतील रहिवासी मोठ्या संख्येत नागपूर विदर्भात राहतात. त्यातील बहुतांश जण बांधकाम स्थळी मजुरी करतात. काही जण फळ, भाज्यांचे हातठेले लावतात. यातील बहुतांश मंडळी दसरा, दिवाळी आणि छटपूजेसाठी आपापल्या गावाला जातात. त्यामुळे सणासुदीच्या वेळी नागपूर रेल्वे स्थानकावर या प्रवाशांची प्रचंड गर्दी असते.