लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात लावण्यात आलेल्या ऑटोमेटीक तिकिट व्हेंडिंग मशिनला (एटीव्हीएम) रेल्वे प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काउंटरसमोरच्या रांगेत ताटकळत उभे राहण्याऐवजी रेल्वे प्रवासी या मशिनवर जाऊन पाहिजे ती तिकिट काढून घेत आहेत.
रेल्वे स्थानकावर कुठे गर्दी असो वा नसो, मात्र तिकिट बुकिंग काउंटरवर हमखास आणि २४ तास गर्दी आढळते. या गर्दीत तिकिट काढण्यासाठी उभे झाल्यास अनेकदा गाडी सुटण्याचाही धोका असतो. गर्दीत ताटकळत राहण्याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती मातांना होतो. अलिकडे काही महिन्यात रेल्वे गाड्यांमधील गर्दी चांगलीच वाढली असल्याने तिकिट घेण्यासाठी बराच वेळ रांगेत प्रतिक्षा करावी लागते. तिकडे गर्दीमुळे तिकिट देणाऱ्या स्टाफचीही तारांबळ उडते. हे सर्व लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्सची (एटीव्हीएम) कल्पना काही महिन्यांपूर्वी मांडली होती. त्यानुसार, त्या मशिन खरेदी करण्यात आल्या. नागपूर रेल्वे स्थानकावर अशा एटीव्हीएम लावण्यात आल्या. प्रवाशांसाठी या मशिन अत्यंत चांगला पर्याय ठरल्या आहेत. प्रवाशांनी जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत या मशिन्सचा वापर करून ७ लाख, ६६ हजार, ६०७ तिकिट काढल्या. या मशिन्सच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला ५ कोटी, २४ लाख, २६ हजार, ३२० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
एटीएमसारखाच सुलभ वापरतिकिट काढण्याची ही मशिन एटीएमसारखीच वापरायला सुलभ आहे. टच स्क्रीनमुळे या मशिनच्या माध्यमातून जलदगतीने तिकिट काढता येते. परिणामी रांगेत उभे राहण्याच्या त्रासदायक पद्धतीला टाळता येते. तिकिटाची रक्कम युपीआय, स्मार्ट कार्डच्या माध्यमातून देखिल अदा केली जाऊ शकते.