नागपूर : सहा महिन्यांच्या बाळाची चोरी आणि अपहरण करून त्याला तेलंगणात विकण्यासाठी नेण्याच्या प्रकरणात फरार असलेली आरोपी विजया हिच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांचे एक पथक तेलंगणाला रवाना झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात आलेल्या सुनील रुढे, माया चव्हाण आणि सुजाता गाजलवार या तिघांची पोलीस कस्टडीत चाैकशी केली जात आहे.
गुरुवारी, ६ जूनच्या पहाटे आरोपी सुनील आणि मायाने मुख्य रेल्वे स्थानकावरून एका भिक्षेकरी दाम्पत्याच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले होते. त्याला विकण्यासाठी आरोपी सुनील आणि माया मंचेरियाला जात होते. मात्र, वेळीच तक्रार मिळाल्याने रेल्वे पोलिसांनी मंचेरिया (तेलंगणा) पोलिसांच्या मदतीने आरोपी सुनील तसेच मायाला आसिफाबाद शहरात ताब्यात घेतले. हे बाळ ते दोघे सुजाताच्या मदतीने विजयाला विकणार होते, अशी माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी सुजातालाही पकडले.
मात्र, विजया फरार झाली. ईकडे सुनील, माया आणि सुजाताला अटक केली आणि त्यांना अपहृत बाळासह शुक्रवारी नागपुरात आणले. ते सध्या पीसीआर मध्ये आहेत. त्यांच्याकडून तसेच मंचेरिया पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे फरार विजयाबाबत माहिती मिळाल्यामुळे तिला अटक करण्यासाठी रेल्वे पोलिसांचे पथक शनिवारी रात्री तेलंगणाकडे रवाना झाल्याचे कळते. तिला अटक केल्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात, असा अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.