अजनीच्या मैदानावर लॉनचा प्रस्ताव : शासकीय कर्मचाऱ्यांनाही सवलतीच्या दरात उपलब्धदयानंद पाईकराव -नागपूरलग्न समारंभासाठी वापरण्यात येणाऱ्या सभागृहाचे, लॉनचे भाडे सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लग्न कमी खर्चात उरकावे यासाठी लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी अजनी पोलीस मैदानावर लॉन तयार करण्याचे ठरविले असून आगामी काळात पोलीस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे शुभमंगल अर्ध्या खर्चात उरकण्यास मदत होणार आहे.लोहमार्ग पोलिसांच्या अजनी येथील मुख्यालयात मोठे मैदान आहे. येथे पोलीस भरती, क्रीडा स्पर्धांचे नेहमीच आयोजन करण्यात येते. या मैदानाच्या उत्तर-पूर्व भागात लग्न समारंभासाठी लॉन तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात १ हजार लोकांच्या क्षमतेचा हॉल तर १ हजार चौरसफूटांचे लॉन तयार करण्यात येईल. यात वधूपक्षासाठी दोन आणि वरपक्षासाठी दोन खोल्या तयार करण्यात येतील. याशिवाय १ डायनिंग हॉल, १ किचन आणि प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. लॉनच्या प्रस्तावाची माहिती दिल्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक टी. एस. भाल यांनी एप्रिलमध्ये या मैदानाची पाहणी केली होती. लॉन तयार झाल्यानंतर पोलिसांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना ते अर्ध्या किमतीत भाड्याने देण्यात येणार असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे शुभमंगल कमी खर्चात होणार असल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी अजनीचे मैदान भाड्याने देऊन तसेच पोलीस कल्याण निधीतून बांधकामासाठी निधी गोळा करण्यात येणार आहे. याशिवाय उत्तरेकडील भागात ९९ दुकानांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रस्तावही बीओटी तत्त्वावर तयार करण्यात आला असून इच्छुकांकडून विक्री किंवा भाडेतत्त्वावर डिपॉझिट घेऊन या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम सुरू करण्यात येणार आहे.
लोहमार्ग पोलिसांना मिळणार बळ
By admin | Published: July 25, 2014 12:51 AM