नागपूर : मानकापूर रेलवे क्राॅसिंगवर आरयूबी उभारल्यावर रेल्वेलाईन ओलांडणाऱ्यांवर नियंत्रण राखण्यासाठी येथे अलीकडेच सुरक्षा भिंत उभारण्यात आली. मात्र या भिंतीचा एक भाग उभारताच कोसळला. ज्या ठिकाणाहून भिंत पडली, तिथून आता गुराखी सर्रास येजा करतात, रेल्वे ट्रॅकही ओलांडतात, यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
मध्य रेल्वे नागपूर मंडळाअंतर्गत सेवाग्राम ते काटाेलपर्यंत रेल्वे ट्रॅकच्या कडेने नागरिक येजा करीत असलेल्या भागात सुरक्षा भिंत बांधली जात आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मानकापूर रेल्वे गेटजवळ १०० मीटर अंतरावर मागील एक वर्षापासून काम सुरूच आहे. कामाच्या गुणवत्तेकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. वरिष्ठ अधिकारी तर नाहीच, पण कनिष्ठ अधिकारीही कधी येऊन बघत नाहीत. यामुळे कंत्राटदार अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम करीत आहेत. सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या गाेधनी स्टेशनच्या क्रमांक एकच्या प्लॅटफाॅर्म बांधकामादरम्यान भेग पडली होती, हे विशेष !