लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली. मध्य रेल्वेने महिनाभरात ३.६८६ दशलक्ष टन माल वाहतुक केली. ३४ हजार ४९७ वॅगनमधून कोळसा आणि २५ हजार ३८० कंटेनरमधुन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. परंतु अन्नधान्य, औषध, कोळसा, पेटोल, डिझेल, रॉकेल, दूध, भाजीपाला आणि इतर बाबींचा पुरवठा करण्यासाठी विशेष पार्सल रेल्वेगाड्या आणि मालगाड्यांच्या माध्यमातून वाहतूक सुरू आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर, मुंबई, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातील विविध टर्मिनल्सवर दररोज ७५ मालगाड्या तसेच विशेष पार्सल रेल्वेगाड्या सुरू आहेत. त्यासाठी गुड्स शेड, विविध रेल्वेस्थानके आणि नियंत्रण कार्यालयातील कर्मचारी कार्यरत आहेत. मध्य रेल्वेने २३ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान १ हजार ४१५ मालगाड्यांद्वारे ३.६८६ दशलक्ष टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली. यात मध्य रेल्वेने दररोज कोळशाच्या २ हजार २७० वॅगनचा समावेश आहे. नागपूर विभागाने २५ मार्च ते २४ एप्रिल दरम्यान ५५१ मालगाड्यांच्या ३१ हजार ८६७ वॅगनमधून २.१९६ दशलक्ष टन कोळसा भरून पाठविला. नागपूरसह इतर विभागात एकूण २५२ वॅगनमधून धान्य, ४८४ वॅगनमधून साखर, २५ हजार ३८० वॅगनद्वारे विविध जीवनावश्यक व वॅगनमधून इतर वस्तूंची वाहतुक, ५ हजार १८३ वॅगन्समधून पेट्रोलियम उत्पादने, १८०२ वॅगनमधून खत, ६३५ वॅगनद्वारे स्टील, २५२ वॅगनद्वारे डी-आॅईल केक आणि ११७ वॅगनमधून सिमेंट व १७७२ वॅगनद्वारे इतर वस्तूंची वाहतूक केली. या सोबतच सुमारे २२० पार्सल गाड्यांमधून औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग इत्यादी आवश्यक वस्तू देशभरात पाठविण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळात औषधी, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, बियाणे, टपाल पिशव्यांची वाहतूक करण्यात आली.
रेल्वेच्या वतीने महिनाभरात ३ दशलक्ष टन माल वाहतूक ३४ हजार ४९७ वॅगनद्वारे कोळशाचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 11:45 AM