लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळ्यात रेल्वे रुळात हेअर क्रॅक येते. वेळीच लक्षात न आल्यास त्यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो. त्यासाठी रेल्वेची यंत्रणा सतर्क झाली आहे. रेल्वे रुळांची प्रत्यक्ष देखभाल करणाऱ्या गँगमनला हेअर क्रॅककडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे रुळांच्या देखभालीचे काम गँगमन करतात. अनेकदा गँगमनने सतर्कता दाखविल्यामुळे मोठमोठे अपघात टळले आहेत. हिवाळ्यात थंडीमुळे रेल्वे रुळांमध्ये हेअर क्रॅक होण्याची भीती असते. रुळ तडकल्यामुळे आणि ही घटना वेळीच लक्षात न आल्यास रेल्वेगाडी रुळावरून घसरुन मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात हेअर क्रॅकच्या घटनांवर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना गँगमनला देण्यात आल्या आहेत. या शिवाय कि मॅन रेल्वे रुळाच्या नटबोल्टकडे लक्ष पुरवित आहेत. नाईट पेट्रोलिंगही वाढविण्यात आली आहे. युएसएफडी मशीनने नियमित देखभाल करण्यात येत आहे. हेअर क्रॅकची घटना त्वरित लक्षात यावी यासाठी रेल्वेच्या वतीने सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत असल्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अशा घटना घडणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाईट पेट्रोलिंग वाढविले
‘हिवाळ्यात रेल्वे रुळात हेअर क्रॅक होण्याची शक्यता असते. त्यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. नाईट पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहे. गरज भासल्यास ट्रॅक रिन्यूअल करण्यात येत आहे. तसेच गँगमनला विशेष लक्ष पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’
-कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग