नागपूर : देशाची लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झुक झुक रेल्वे गाडीचा वेग आता चांगलाच वाढला आहे. एकीकडे विकासाचे इंजिन आणि दुसरीकडे उत्पन्नाचे नव नवे स्त्रोत शोधून रेल्वे प्रशासन आपल्या तिजोरीत भरभरून माप घालत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जानेवारी महिन्यात विशेष तिकिट तपासणी मोहिम राबवून अवघ्या ३१ दिवसांत २ कोटी, ४१ लाख रुपयांची कमाई केली आहे.
रेल्वे प्रशासनाने गेल्या काही वर्षांत प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीत बदल करून, वेगवेगळे जोड देऊन उत्पन्नाचे स्त्रोत वाढविले आहेत. त्यात माल वाहतुकीच्या पारंपारिक साधनांतही विस्तार केला. साखर, अन्न, धान्य, सिमेंट, कोळसा, लोखंड, वाहने, राखडची वाहतूक करून रेल्वेने आपल्या उत्पन्नात घसघशीत वाढ केली आहे. जानेवारी २०२४ म्हणजेच अवघ्या एका महिन्यात मध्य रेल्वेने १०१५ रॅक कोळशाची वाहतूक करून रेल्वेने ४१७.३१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. हे करतानाच विना तिकिट प्रवास करणाऱ्या आणि एका दर्जाचे तिकिट घेऊन दुसऱ्याच (एसी) कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही धडा शिकविणे सुरू केले आहे.
अशांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दामदुप्पट वसुली करण्यासाठी विशेष तपासणी मोहिमही अधूनमधून राबविली जात आहे. अशाच प्रकारे गेल्या जानेवारी महिन्यातील ३१ दिवसांत मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या मार्गावर तिकिट तपासणी मोहिम राबविली. या मोहिमेत दरदिवशी साधारणत: सुमारे २ हजार प्रवाशांची तपासणी केली. त्यातून ४०,८५३ विना तिकिट तसेच जनरलचे तिकिट घेऊन एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून दंडापोटी रेल्वे प्रशासनाने २ कोटी, ४१ लाख रुपये वसूल केले.