नागपूर : आधुनिक काळात नोकरी मिळविणे कठीण झाले आहे. त्यामुळे उच्चशिक्षित युवकांना मिळेल ते काम करून आपली उपजीविका भागवावी लागत आहे. अशा स्थितीत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने मोतीबागच्या वर्कशॉपमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना वेल्डर, फिटर आणि मशिनिस्ट या ट्रेडचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करून संबंधित उमेदवार शासकीय नोकरी किंवा आपला स्वयंरोजगार सुरू करून आपली उपजीविका भागवू शकणार आहेत, हे विशेष.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने रेल्वेच्या प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून औद्योगिक कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन युवकांना सशक्त बनविण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा प्रारंभ रेल्वे भवनात रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेनुसार देशभरातील ५० हजार युवकांना प्रशिक्षित करून नोकरी योग्य, तसेच स्वयंरोजगारासाठी तयार करण्यात येणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर, रायपूर आणि नागपूर विभागात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नागपुरातील मोतीबाग वर्कशॉपमध्ये वेल्डिंग ट्रेडमधील २० प्रशिक्षणार्थ्यांना सुरुवातीला प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फिटर आणि मशिनिस्ट या ट्रेडचे प्रशिक्षणही प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण घेऊन संबंधित उमेदवार नोकरी मिळवू शकतात किंवा आपला स्वयंरोजगार सुरू करून आपली उपजीविका भागवू शकतात. त्यामुळे हे प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगारांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
............
स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण उपयुक्त ठरणार
‘मोतीबाग रेल्वे वर्कशॉपमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना वेल्डिंग ट्रेडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करून संबंधित उमेदवार शासकीय नोकरी मिळवू शकतात. शासकीय नोकरी न मिळाल्यास संबंधित उमेदवार आपला स्वयंरोजगार सुरू करून आपली उपजीविका भागवू शकतात. त्यामुळे हे प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.’
-ललित धुरंधर, चिफ वर्कशॉप मॅनेजर, मोतीबाग वर्कशॉप
............