रेल्वेगाड्या फुल्ल : ईद, ख्रिसमसमुळे वाढली गर्दीनागपूर : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबरला संपले. त्यानंतर मुंबई, पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणाऱ्या आमदार, आंदोलकांची गर्दी २५ डिसेंबरपर्यंत रेल्वेगाड्यात होती. त्यानंतर ईद, ख्रिसमस, चौथा शनिवार आणि त्यानंतर रविवार अशा सलग चार दिवस सुट्या आल्यामुळे रेल्वे प्रवाशांची गर्दी अचानक वाढली. नागपुरातून चारही दिशांनी जाणाऱ्या रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दीच गर्दी पाहावयास मिळाली. नागपुरात सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबरला आटोपले. त्यानंतर विविध जिल्ह्यातून आलेले आमदार, मोर्चेकरी, धरणे आंदोलन करणाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. २५डिसेंबरपर्यंत सर्वच गाड्या फुल्ल असल्याची स्थिती होती. त्यानंतर ही गर्दी ओसरण्याची शक्यता वर्तविली जात असताना अचानक ४ दिवस शासकीय सुट्या आल्यामुळे ही गर्दी कायमच राहिली. २४ डिसेंबरला ईदनिमित्त तसेच २५ डिसेंबरला ख्रिसमस निमित्त रेल्वेगाड्यात गर्दी वाढली. त्यानंतर चौथा शनिवार आणि रविवारी सुटी असल्यामुळे अनेकांनी चार दिवस सुट्या असल्याची संधी साधून कुुटुंबासह बाहेरगावी जाण्याचा बेत आखला. यामुळे नागपुरातून ये-जा करणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या प्रवाशांच्या गर्दीने खच्चुन भरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात २४ ते २७ डिसेंबरपर्यंत विदर्भ एक्स्प्रेस ३००, दुरांतो एक्स्प्रेस २०७, सेवाग्राम १८० एवढी वेटींग होती. पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेसमध्ये २०४ वेटींग, नागपूर-पुणे एक्स्प्रेस ३०९ वेटींग, गरीबरथ एक्स्प्रेस २६५ वेटींग होते. दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व गाड्यात १०० ते १३० पर्यंत वेटींग पाहावयास मिळाली. (प्रतिनिधी)
सलग सुट्यांमुळे वाढले रेल्वेचे प्रवासी
By admin | Published: December 26, 2015 3:44 AM