लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकदा रेल्वेने महिला एकट्या प्रवास करतात. प्रवासात त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ‘रेल्वे वीरांगणा’ नावाचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये आरपीएफच्या महिला अधिकारी, कर्मचारी, रेल्वे रनिंग स्टाफमधील कर्मचारी आणि दररोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या महिलांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता महिलांचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.रेल्वे बोर्डाने २०१८ हे वर्ष महिला प्रवासी सुरक्षा वर्ष म्हणून जाहीर केले आहे. यानिमित्त भारतीय रेल्वेतर्फे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागपुरात अलीकडेच महिलादिनी अजनी स्थानक पूर्णत: महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात आले. संपूर्ण महिलांतर्फे संचालित होणारे हे मध्य भारतातील पहिलेच रेल्वे स्थानक आहे. आता आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांच्या पुढाकाराने ‘रेल्वे वीरांगना’ नावाचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. रेल्वे गाडीत किंवा रेल्वेस्थानकावर महिलांसबोत काही अनुचित प्रकार होत असेल तर ग्रुपच्या माध्यमातून मदतीसाठी संवाद साधता येणार आहे. महिलांनी ग्रुपवर दिलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेतली जाणार आहे. ग्रुपमुळे महिला प्रवासी आणि आरपीएफ यांच्यात थेट संवाद राहील. महिला प्रवाशांबाबत काही सूचना असल्यास त्यासुद्धा या ग्रुपवर करता येणार आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील विविध स्थानकांशी संबंधित जवळपास ८५ महिला प्रवाशांचा सध्या या ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.यामुळे रेल्वेतील महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘रेल्वे वीरांगना’ व्हॉट्स अॅप ग्रुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:11 AM
अनेकदा रेल्वेने महिला एकट्या प्रवास करतात. प्रवासात त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ‘रेल्वे वीरांगणा’ नावाचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला आहे.
ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलाचा उपक्रम