नागपूर : दोन वर्षांपूर्वी बंद केलेला रेल्वेच्या झोनचा टाईम टेबल (ट्रेन ॲट ए ग्लांस) अखेर प्रकाशित झाला. तो काउंटरवर प्रवाशांसाठी उपलब्धही आहे. मात्र, रेल्वेने त्याची किंमत वाढवून तो प्रवाशांच्या हातात ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नासोबतच अनेक बाबींवर विपरित परिणाम झाला होता. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक निर्बंध लागू केले होते. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या अनेक सवलती तसेच सेवा-सुविधाही बंद केल्या होत्या. मात्र, हळूहळू निर्बंध हटविले आणि त्यानंतर काही सोयी, सुविधा पुन्हा सुरू केल्या. मात्र, रेल्वेचा तोटा वाढल्याचे कारण सांगून अनेक सवलतींना स्थगिती दिली. त्यापुढे मागे सुरू होतील, असा त्यावेळी प्रवाशांचा समज होता. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासाच्या भाड्यात मिळणाऱ्या सवलतीसह अनेक सवलती बंदच करून टाकल्या. यासंबंधाने होणारा विरोधही दुर्लक्षित करण्यात आला.
त्यानंतर तिकिटाचे आणि सोयी सुविधांचेही भाडे वाढविले. दरम्यान, कोरोनामुळे बंद करण्यात आलेल्या काही सेवांमध्ये रेल्वेचा दरवर्षी प्रकाशित केला जाणारा टाईम टेबलचाही समावेश होता. या टाईम टेबलमुळे संबंधित झोनमधील धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचा टाईम टेबल असायचा. तो आता दोन वर्षांनंतर रेल्वे प्रशासनाने अखेर प्रकाशित केला. बंद करतेवेळी हा टाईम टेबल (२०१८-२०१९)ला प्रवाशांना बुकिंग काऊंटरवर ७० रुपयांत मिळायचा. आता मात्र याच टाईम टेबलसाठी रेल्वे प्रशासन १०० रुपये वसूल करीत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, आधीच्या टाईम टेबलमध्ये रेल्वेेत कोणत्या सोयी सुविधा मिळणार त्याचा उल्लेख असायचा. आताच्या टाईम टेबलमध्ये तसा कोणताही उल्लेख नसल्याचे भारतीय रेल्वे यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी म्हटले असून, वाढलेली किंमत प्रवाशांवर अन्याय करणारी आहे, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
वाढता वाढता वाढली किंमत
यापूर्वी २०१४ - १५ चा टाईम टेबल ४० रुपयांत मिळायचा. २०१६-१७ ला तो ५० रुपये तर २०१८-१९ मध्ये तो ७० रुपयांत रेल्वेने उपलब्ध करून दिला होता. आता मात्र त्यासाठी रेल्वे प्रशासन १०० रुपये वसूल करीत आहे.
---