लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णाची स्थिती गंभीर होती. त्याला रेमडेसिविर इंजेक्शनची तातडीने गरज होती. खूप प्रयत्न करूनही इंजेक्शन मिळाले नाही. अखेर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मुंबई आणि विजयवाडा येथून तातडीने १० तासात हे इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे संबंधित रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
अंबाझरी येथील ५४ वर्षांची महिला कोरोना झाल्यामुळे वैशाली नगरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. महिलेची ऑक्सिजनची पातळी खालावली होती. त्यांना रेमडेसिविर इंजेक्शनची तातडीने गरज होती. परंतु, इंजेक्शन मिळत नसल्यामुळे नातेवाईकांचा नाईलाज झाला. या महिलेच्या भावाने रेल्वेची माहिती असलेले सुरज खापर्डे यांना याबाबत कळविले. त्यांचा भाऊ तुषार हिरखणे हा विजयवाडा येथे राहतो. हिरखणे यांनी तीन इंजेक्शन मिळवली. परंतु, ती नागपुरला कशी पाठवावी, असा प्रश्न होता. त्यामुळे खापर्डे यांनी रेल्वेची मदत घेतली. बल्लारशाह येथील मध्य रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक कैलाश सोमकुवर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विजयवाडा येथून येणाऱ्या रेल्वेगाडीची माहिती दिली. ०५११९ मंडुआदिह फेस्टिवल ही विशेष रेल्वेगाडी रात्री ८ वाजता निघणार होती. तुषारने इंजेक्शन गाडीतील टीटीईकडे दिले. बल्लारशाहला गाडी आल्यानंतर टीटीईने हे इंजेक्शन सोमकुवर यांच्याकडे सोपवले. त्यानंतर मध्य रेल्वेतील मुख्य तिकीट निरीक्षक आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे विभागीय सचिव सय्यद आसीफ अली यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी लगेच हालचाल करून नागपूरकडे येणाऱ्या गाडीतील तिकीट तपासनीस व्यंकटेस्वरलु यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सकाळी ६ वाजता हे इंजेक्शन नागपुरात पोहोचले. त्यांनी हे इंजेक्शन खापर्डे यांच्याकडे सोपवले. त्यानंतर खापर्डे यांनी मुंबईतील मित्राशी संपर्क साधून दोन इंजेक्शनचा बंदोबस्त केला. सय्यद आसीफ अली यांच्या प्रयत्नाने मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसने दोन इंजेक्शन नागपुरात पोहोचली. केवळ १० तासांत पाच इंजेक्शन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णाला मिळाल्यामुळे संबंधित महिला रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. संबंधित महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांचे आभार मानले.
..........