नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात नागपूर-पुणे- नागपूर मार्गावर द्वि-साप्ताहिक एसी सुपर फास्ट स्पेशल ट्रेनच्या ८ फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने बदलविला. आता ८ नव्हे तर १४ फेऱ्या चालविल्या जाणार असल्याचे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सवाला लगेच सुरुवात होणार त्यानंतर लगेच नवरात्र, दसरा, दिवाळीची धूम आहे. नागपूर-पुणे रेल्वे मार्गावर बारा महिने प्रवाशांची गर्दी असते आणि सणोत्सवाच्या दिवसांत त्यात आणखी भर पडते, ते ध्यानात घेऊन मध्य रेल्वेने २८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर सुपर फास्ट एसी स्पेशल ट्रेन (एकूण ८ फेऱ्या) चालविण्याचा निर्णय घेतला होता. दोनच दिवसांत हा निर्णय बदलवून या गाड्या आता २१ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ दरम्यान (एकूण १४ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूरहून प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी रात्री ७:४० वाजता ती नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता पुण्याला पोहोचणार असून गाडी नंबर ०१२०२ पुणे नागपूर सुपरफास्ट ही गाडी दर मंगळवारी आणि शनिवारी दुपारी ३:५० वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता नागपुरात पोहोचणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेने या दोन गाड्यांच्या ८ ऐवजी १४ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांना चांगला दिलासा मिळणार आहे.